“सोशल मिडिया बंद करायला आठ दिवसांचा वेळ; नोटबंदी मात्र क्षणात”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 12:17 PM2020-03-03T12:17:59+5:302020-03-03T12:18:21+5:30
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाला सोडचिठ्ठी देण्याचा धक्कादायक इरादा सोमवारी रात्री अचानक जाहीर केला.
मुंबई : आपण सोशल मीडियापासून दूर जाण्याच्या विचारात असल्याचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर जाहीर केलं. त्यानंतर सोशल मीडियावर एकच भूकंप झाला. याबद्दल रविवारी बोलू असं मोदींनी म्हटलंय. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "सोशल मिडिया बंद करायला आठ दिवसांचा वेळ घेतलाय, पण नोटबंदी मात्र क्षणात केली होती. म्हणजेच न विचार करता घेतलेले निर्णय किती घातक असतात याची कल्पना आल्यामुळे त्यांनी आठ दिवसांचा वेळ घेतला असेल का? असा खोचक टोला आव्हाड यांनी मोदींना लगावला आहे.
सोशल मिडिया बंद करायला आठ दिवसांचा वेळ घेतलाय पण नोटबंदी मात्र क्षणात केली होती.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 3, 2020
म्हणजेच न विचार करता घेतलेले निर्णय किती घातक असतात याची कल्पना आल्यामुळे त्यांनी आठ दिवसांचा वेळ घेतला असेल का??
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाला सोडचिठ्ठी देण्याचा धक्कादायक इरादा सोमवारी रात्री अचानक जाहीर केला. सोशल मीडियाच्या वापराच्या बाबतीत मोदींची तत्परता व चपखलता हा नेहमीच चर्चेचा व कौतुकाचा विषय आहे. असे असूनही जनतेशी संवाद साधण्याच्या या प्रभावी माध्यमांतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा विचार त्यांनी का केला, हे समजू शकलेलं नाही. रात्री ८.५२ वाजता हा धक्का देताना मोदी यांनी लिहिले की, टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन.