'होय शरद पवार हे जाणता राजाच': जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 02:57 PM2020-01-14T14:57:02+5:302020-01-14T14:59:39+5:30
उदयनराजेंच्या या टीकेचा आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला
पुणे : जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे जानता राजा उपमा देताना विचार करावा, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली. तर उदयनराजेंच्या या टीकेचा आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला असून, 'होय शरद पवार हे जाणता राजाच' असे ते म्हणाले आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलताना उदयनराजे म्हणाले की, जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज. अनेकांना जाणता राजाची उपमा देतात. त्याचाही मी निषेध करतो. जानता राजा उमपा देताना विचार करण्याची गरज असल्याचे सुद्धा ते म्हणाले होते.
त्यांच्या टीकेला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, "होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न, प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेत" असे आव्हाड म्हणाले.