जितेंद्र आव्हाड यांच्या नावे बनावट FB खातं, अभिनेत्रीसह अनेकांना पाठवलेे अश्लिल मॅसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 11:22 PM2017-09-15T23:22:25+5:302017-09-15T23:25:08+5:30
ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बनावट खाते उघडून एका मराठी अभिनेत्रीसह अनेकांना अश्लिल मॅसेज केले आहे.
मुंबई, दि. 15 - ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बनावट खाते उघडून एका मराठी अभिनेत्रीसह अनेकांना अश्लिल मॅसेज केले आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिस आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केली नाही. पोलिसांनी बनावट फेसबुक खाते उघडून त्याचा चुकीचा वापर करणा-यांचा शोध आणि तपास सुरु केला आहे.
जितेंद्र आव्हाडांनी याबाबत सांगितले की, माझ्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुक खाते उघडले होते. ते खाते कधीपासून कार्यरत आहे याची माहिती मला माहित नाही. मात्र, नुकतेच त्या खात्यावरून एका मराठी अभिनेत्रीला अश्लिल चॅटिंगसह मॅसेज पाठवले गेले. त्यानंतर संबंधित अभिनेत्रीने एका मित्राद्वारे याबाबत माझ्याकडे विचारणा केली. मात्र, आपण असे कोणतेही मॅसेज केले नाहीत याची माहिती दिली. यानंतर संबंधित फेसबुक खाते तपासण्यास सांगितले असता ते खाते बनावट निघाले.
Somebody is actively operating a fake FB account on my name have given it in writing to cyber cell .Can I expect action @ThaneCityPolice
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 14, 2017
यानंतर, जितेंद्र आव्हानांनी बनावट फेसबुक खाते तयार करून त्याचा चुकीचा वापर केल्याच्या विरोधात अज्ञाताविरोधात ठाणे पोलिसांत तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. हे प्रकरण सायबर क्राईमशी संबंधित असून, हे खाते कोणी, कधी व कोणत्या आयपी अॅड्रेसवरून बनवला याचा शोध घ्यावा लागेल असे सांगितले. हे प्रकरण सायबर क्राईम विभागाकडे सोपविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे.
फेसबूकवर आव्हाड यांना अश्लिल शिविगाळ
फेसबूक पेजवर आ. जितेंद्र आव्हाड यांना अश्लिल शिविगाळ करणा-या विक्रोळी येथील युवकाविरूद्ध नौपाडा पोलिसांकडे शुक्रवारी तक्रार देण्यात आली. देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षततेची भावना बळावत असल्याचे प्रतिपादन हमीद अन्सारी यांनी उपराष्ट्रपती पदाची कारकिर्द संपल्यानंतर केले होते. कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्याचे समर्थन करणारी प्रतिक्रिया एका मराठी वृत्तवाहिनीला दिली होती. वृत्तवाहिनीने आव्हाड यांची प्रतिक्रीया स्वत:च्या फेसबूक पेजवरही प्रसिद्ध केली. आव्हाड यांच्या या प्रतिक्रियेचे संमिश्र पडसाद उमटले. विक्रोळी येथील साईनाथ पाटील (वय २४) याने प्रतिक्रीया व्यक्त करताना आव्हाड यांना अश्लिल शिविगाळ करून धमकीही दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाण्याचे अध्यक्ष अभिजीत पवार यांनी शुक्रवारी रात्री यासंदर्भात नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवून युवकाला चौकशीसाठी ठाण्यात बोलविले होते.