"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 03:18 PM2024-05-30T15:18:59+5:302024-05-30T15:20:37+5:30
जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न केले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
जळगाव : गेल्या काही दिवसापासून शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश होणार असल्याचा मुद्दा चर्चेत आहे. यावर 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निषेध करत बुधवारी महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. मात्र, यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टरही फाडण्यात आल्याचे समोर आले. यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड हे मनोविकृत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न केले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेला प्रकार हा वाईट आहे. अशा माणसावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आपल्या हातात आहे, हे ज्या माणसाला कळत नाही. हा मनोविकृत माणूस आहे, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. तसेच, जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न केले आहेत, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. याशिवाय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फाडला आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीही गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, भाजपा नेते आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. खोटं बोलण्याला मर्यादा असते, जितेंद्र आव्हाड खोटं बोलत आहेत. शिक्षण विभाग मनुस्मृतीचा कोणताही भाग घेणार नाही, याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तरीही आंदोलन केले जात आहे, लोकांच्यात गोंधळ निर्माण केला जात आहे. मनुस्मृतीच्या पोस्टरवर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्याचा अर्थ काय होता? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला आहे, हा सरळ सरळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायींचा अपमान आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली आहे.