'खुनाचा गुन्हा चालला असता; पण माझा जन्म 354-376 साठी नाही झाला', जितेंद्र आव्हाड भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 05:30 PM2022-11-14T17:30:26+5:302022-11-14T17:30:57+5:30
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.
मुंबई: मराठी चित्रपट 'हर हर महादेव' याचे शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन मिळाला, पण आव्हाडांविरोधात एका महिलेने विनयभंगाची (Molestation) तक्रार दाखल केली. या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आव्हाड अतिशय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
'खुनाचा गुन्हा चालला असता, पण...'
विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी आव्हाड म्हणाले की, 'माझ्यावरचा गुन्हा हा केवळ षड्यंत्राचाच भाग आहे. 'हर हर महादेव' चित्रपट प्रकरणात मला विनाकारण कोठडीत ठेवलं. कालचाही प्रकार अतिशय चुकीचा आहे. यापेक्षा राजकारणात न राहिलेलं बरं. मी सगळं मान्य करेन पण 354(विनयभंग) आणि 376, यासाठी माझा जन्म झालेला नाही. एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता, पण हे मला सहन होत नाही,' असं म्हणत आव्हाड भावूक झाले.
'राजकारणात राहायचं नको'
आव्हाड पुढे म्हणाले की, 'ही गोष्ट माझ्या काळजाला लागली आहे. माझ्यावर इतर कोणताही आरोप केला असता तर चालला असता, पण 354 मला मान्यच नाही. समाजात माझी मान खाली जाईल असा गुन्हा माझ्यावर टाकला गेला. मी आयुष्यात असं काही करू शकत नाही. हा मोठ्या कटाचा भाग आहे. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण होऊ नये. ही कारवाई माझ्या मनाला लागली आहे. त्यापेक्षा राजकारणात राहायचं नको,' असंही आव्हाड म्हणाले.
जयंत पाटील काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वत: त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'माझा राज्य सरकार आणि पोलिसांना प्रश्न आहे की, काल झालेली घटना ही 354 मध्ये कुठे बसते हे दाखवून द्या. मुख्यमंत्री गाडीत असताना, पोलीस अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त असताना विनयभंग कसा होईल? मनात राग ठेऊन सरकारने ही कृती केली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि ठाणे पोलिसांनी हे प्रकरण या गुन्ह्यात कसं बसवलं, गृहमंत्र्यांनी नेमकं काय सुरू आहे, ते बघावं,' असं पाटील म्हणाले.