मदरशात दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडेन, जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 06:01 PM2022-04-03T18:01:52+5:302022-04-03T18:03:26+5:30
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मदरश्यांबाबत केलेल्या विधानाचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
मुंबई-
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मदरश्यांबाबत केलेल्या विधानाचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 'पंतप्रधानांना माझी विनंती आहे की त्यांनी मदरश्यांमध्ये धाडी टाकाव्यात. या मदरश्यांमध्ये काय काय सापडेल ना ते पाहून धडकी भरेल', असं विधान राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात केलं. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत मदरश्यात दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडेन, असं खुलं आव्हान राज ठाकरे यांना दिलं आहे.
आपल्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा फॉर्म्युला आहे असं सांगून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची भाषा करणारे राज ठाकरे मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का अधोगती आहे कळत नाही, असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. "राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केलं. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईल. मुंब्र्यात काही शतक हिंदू मुसलमान प्रेमाने राहतात", असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले.माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की,त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे.दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईल.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2022
मुंब्र्यात काही शतक हिंदू मुसलमान प्रेमानी राहतात
मुंब्र्याला बदनाम करू नका
"कळवा-मुंब्रा या मतदार संघात ६७ टक्के हिंदू आहेत आणि ३३ टक्के मुसलमान त्यात मी ७५ हजार मतांनी विजयी झालो. कळव्यातून ३० हजार मतांची आघाडी आणि मुंब्र्यातून ४५ हजार मतांची आघाडी. लोक कामावर मत देतात जाती पातीवर नाही. १८ तास राबावे लागते. शेवटच्या माणसापर्यंत पोहचावे लागते", असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
कळवा-मुंब्रा ह्या मतदार संघात 67% हिंदू आहेत आणि 33% मुसलमान त्यात मी 75000 मतांनी विजयी झालो कळव्यातून 30000 ची आघाडी आणि मुंब्र्यातून 45000 मतांची आघाडी लोक कामावर मत देतात जाती पाती वर नाही ....18 तास राबावे लागते.शेवटच्या माणसा पर्यंत पोहचावे लागते
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2022
लाखांच्या सभेसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलणं फार सोपं असतं. पण आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील, महाराष्ट्रामध्ये त्याचे काय पडसाद उमटतील याचा जरा तरी विचार करा. ज्या घरात जन्माला आला तुम्ही. त्या घरात महाराष्ट्राची संयुक्त चळवळ उभी राहिली आहे, त्या महाराष्ट्राला जाळायचा प्रयत्न करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.