"साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार, मात्र अत्यंत कृतघ्न निघाला", दिलीप वळसे-पाटलांच्या शरद पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 10:10 AM2023-08-21T10:10:35+5:302023-08-21T10:11:12+5:30
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिलीप वळसे-पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार गटात सामील झालेले दिलीप वळसे-पाटील यांनी थेट शरद पवारांवर टीका केली आहे. जनतेन एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केले नाही, असे दिलीप वळसे-पाटील रविवारी एका कार्यक्रमात म्हणाले. या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. दिलीप वळसे-पाटील सध्या अजित पवारांसोबत असले तरी ते शरद पवारांचे अतिशय विश्वासू मानले जात होते. तरीही शरद पवारांवर इतकी बोचरी टीका दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिलीप वळसे-पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वळसे पाटील यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. "हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले.साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार,साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही,याच आश्चर्य वाटते. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार नाही निवडून आणू शकले" अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे.
याचबरोबर, "वळसे पाटील जे काही बोलले, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही...पण आदरणीय साहेबांच्या साठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले..!! बरे झाले साहेबांन विषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही. आंबेगाव धडा शिकवेल." असेही जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
काय म्हणाले दिलीप वळसे-पाटील?
शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही, असे आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले. तसेच, ईडीवरून होत असलेल्या टीकेला दिलीप वळसे-पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच कोणाला नोटीस सापडली तर आमदारकीचा लगेच राजीनामा देईल, असे चॅलेंज देखील त्यांनी या वेळी दिले. राज्य सरकारमध्ये मी, अजित पवार व काही सहकारी सहभागी झालो. याचा अर्थ भारतीय जनता पक्षात गेलो असे अजिबात नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरच आहोत. ईडी, सीबीआय इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यामुळे राज्य सरकारमध्ये सहभागी झाले असा अपप्रचार केला जात आहे. ते चुकीचे आहे. तशी नोटीस कोणाला सापडली तर घेऊन या तर आमदारकीचा लगेच राजीनामा देईल, असे देखील दिलीप वळसे-पाटील म्हणाले.