नियतीनेच देवेंद्र फडणवीसांना घरी बसवले- जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 01:08 AM2020-01-06T01:08:13+5:302020-01-06T07:10:33+5:30
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता रडत बसले आहेत. ते म्हणताहेत की, वर्गात पहिला आलो तरी मला वर्गाच्या बाहेर बसवले आहे.
कासा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता रडत बसले आहेत. ते म्हणताहेत की, वर्गात पहिला आलो तरी मला वर्गाच्या बाहेर बसवले आहे. पण नियतीनेच फडणवीसांना घरी बसवले आहे, अशी जोरदार टीका कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. डहाणू तालुक्यातील कासा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी वाडा येथील आमदार सुनील भुसारा, माजी खासदार शंकर नम, जिजाऊ संघटनेचे प्रमुख नीलेश सांबरे, राष्ट्रवादी डहाणू अध्यक्ष राजेश पारेख, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, कॉ. बारक्या मंगात, रफिक घांची, काशीनाथ चौधरी व या भागातील उमेदवार उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, भाजपवाले जातीधर्माचे राजकारण करत आहेत. रहिवासी पुरावे मागत आहेत. हा देश आमचा आहे. यांना ६१ सालचे पुरावे कुठून आणणार? या ग्रामीण भागात इंटरनेट नाही. मोखाडा, जव्हारमध्ये अनेक समस्या आहेत. त्यामुळे पाच वर्षे आम्हाला सत्ता द्या. जिल्हा परिषदेत चांगली कामे करून दाखवतो. ही प्रचाराची सभा नाही तर विश्वासाची सभा आहे, असा टोला त्यांनी हाणला. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कासा भागात येऊन प्रचार करून गेले होते.
या वेळी डहाणू तालुक्यातील शिवसेनेचे डहाणू तालुका संघटक संतोष वझे व त्यांचा सहकाऱ्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सभेत बोलताना नीलेश सांबरे म्हणाले की, अनेक नेते येऊन आदिवासी व इतर समाजात भांडणे लावत आहेत. पालघर जिल्हा परिषद हंडामुक्त करायची आहे. शिक्षण, आरोग्य याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. या वेळी माजी मंत्री शंकर नम यांचेही भाषण झाले.