राम मंदिर कुणाच्या बापाची जहागीर नाही; VIP आमंत्रणावरुन जितेंद्र आव्हाड संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 09:38 AM2023-12-28T09:38:49+5:302023-12-28T09:40:20+5:30

मंदिरात आमंत्रण दिले असेल तर या ही पद्धत भारतात कधीपासून सुरू झाली माहिती नाही असं आव्हाडांनी म्हटलं.

Jitendra Awhad targets BJP over the opening ceremony of Ram temple in Ayodhya | राम मंदिर कुणाच्या बापाची जहागीर नाही; VIP आमंत्रणावरुन जितेंद्र आव्हाड संतापले

राम मंदिर कुणाच्या बापाची जहागीर नाही; VIP आमंत्रणावरुन जितेंद्र आव्हाड संतापले

मुंबई - Jitendra Awhad on Ram Mandir ( Marathi News ) अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. मात्र राम मंदिर सोहळ्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरणही तापू लागले आहे. या उद्घाटन सोहळ्याला कुणाकुणाला निमंत्रित करणार यावर सस्पेन्स आहे. मात्र उद्धव ठाकरे VVIP यादीत नाहीत असं विधान भाजपा नेते महाजन यांनी केले त्यानंतर त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. राम मंदिराच्या निमंत्रणावरून सुरु असलेल्या वादात आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत भाजपावर निशाणा साधला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मंदिरात आमंत्रण दिले असेल तर या ही पद्धत भारतात कधीपासून सुरू झाली माहिती नाही. मंदिर कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. ही बापाची मालमत्ता होती तेव्हाच चार्तुवर्ण, क्षुद्र जन्माला आले आणि त्यांना देवळाच्या बाहेर उभं करण्यात आले. तुम्ही आजपण आम्हाला देवळाच्या बाहेर उभं करणार?, तुम्ही आजपण आम्हाला आमंत्रण देणार नाही? आणि परत चार्तुवर्णाची निर्मिती होणार. तुमच्या आमंत्रणाची आणि तुम्ही बोलवण्याची वाट बघणारे आम्ही नाही. आम्हाला जेव्हा जायचे असेल तेव्हा रामाचे नाव घेऊन राम मंदिरात जाऊ. राम कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. आमंत्रण आलं का ही कुठली नवीन संस्कृती, तुमच्या आमंत्रणाची वाट बघणार नाही. आम्हाला जायचे तेव्हा मंदिरात जाऊ असं त्यांनी सांगितले. 

तसेच ज्यादिवशी उद्घाटन होणार त्यादिवशी जाऊ, आम्हाला तुम्ही अडवणार का? बाहेर ठेवणार? आम्ही क्षुद्र आहोत म्हणून आम्हाला मंदिराच्या बाहेर उभं करणार तुम्ही? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून हे सर्व घालवले. काळाराम मंदिरात प्रवेश केला तेव्हाच त्यांनी इशारा दिला. मंदिरापासून तुम्ही रोखू शकत नाही. महाडमध्ये चवदार पाण्याचं आंदोलन केले. हे सर्व बंद करावेच लागेल असा इशारा त्यांनी दिला. संविधानाच्या माध्यमातून हे बंद करून टाकले असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला लगावला. 

दरम्यान, देशामध्ये सर्वांना मंदिरे उघडी करणारे बाबासाहेब हवेत की छोटे दरवाजे करून केवळ VIP दर्शन हे चालणार नाही. दरवाजे तोडून टाकू. तुम्ही  आम्हाला आता रोखू शकत नाही. कायद्याने रोखता येणार नाही. राम मंदिर हे कुणाच्या बापाची जहागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही. एखादे दिवस जे काही थोतांड करायचे असेल ते करून घ्या. निवडणुकीचं वर्ष आले की हे रामाचा बाजार करतात हे अख्ख्या देशाला माहिती आहे. साडेचार वर्ष काहीच काम करायचे नाही आणि शेवटच्या वर्षी राम राम राम करायचे. जनता यांच्यावर राम राम राम म्हणायची वेळ आणणारच आहे असा इशाराही आव्हाडांनी भाजपाला दिला. 

Web Title: Jitendra Awhad targets BJP over the opening ceremony of Ram temple in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.