२२ तारखेचा आणि रामाचा काय संबंध?; जितेंद्र आव्हाडांनी साधला भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 03:04 PM2024-01-16T15:04:36+5:302024-01-16T15:05:27+5:30
मंदिर कुणाच्या बापाचे नाही. मंदिरावर कुणाची मालकी नाही. राम हा सगळ्यांचा आहे असंही आव्हाडांनी म्हटलं.
नागपूर - निवडणुकीच्या अगोदर रामाच्या नावाने वातावरण तयार करून त्याचा फायदा घेणे याच ध्येयातून भाजपाने ही तारीख निवडली. २२ तारखेचा आणि रामाचा काही संबंध आहे का? रामनवमी आहे का? रामाचा काय वेगळा दिवस आहे का? असा सवाल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ही मंदिराची वास्तू अपूर्ण आहे. त्यात प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकत नाही असं शंकराचार्यांनी सांगितलं आहे. तुमच्या घराचं बांधकाम सुरू आहे, पूर्ण प्लास्टर झाले नाही तर तुम्ही तरी राहायला जाल का?. भाजपानं ४ शंकराचार्यांनाच वेड्यात काढले. त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केले हे विचारले. हिंदू धर्मीयांना मार्ग शंकराचार्यांनी दाखवला. त्यांनी ४ पीठ निर्माण केलीत. तुम्ही त्यांना मानणारच नसाल तर ठीक आहे तुम्हीच शंकराचार्य आहात एवढेच म्हणता येईल. त्यांचे कॅलेंडर, पचांग वेगळे आहे. त्यामुळे त्यांना काहीही बोलू शकत नाही अशी टीका त्यांनी केली.
तसेच राम मंदिर होतंय त्याने सगळेच आनंदी आहेत. मीदेखील आनंदी आहे. मंदिर कुणाच्या बापाचे नाही. मंदिरावर कुणाची मालकी नाही. राम हा सगळ्यांचा आहे. राम बहुजन आहे. क्षत्रीय आहे. जर क्षत्रीय नसेल तर भाजपाने पुढे येऊन सांगावे. राम क्षत्रीय म्हणजे बहुजन झाला. या देशात बहुजनांची संख्या सर्वात जास्त आहे. निवडणुकीसाठी भाजपाला रामाची आठवण होते. जनता जर्नादनच आमचा राम आहे. राम तोंडी अन् रावण मनी अशी यांची प्रवृत्ती आहे असंही आव्हाडांनी सांगितले.
दरम्यान, आम्ही बहुजन आहोत. आम्ही मटण खातो. मी रामाच्या विधानावर खेद व्यक्त केला. जर मटण खाणाऱ्या माणसांना तुम्ही शेण खाता असं म्हणत असाल तर या देशातील ८० टक्के लोक शेण खातात. शेण आणि मटण असं जर तुम्ही बोलणार असाल तर ते तुम्हीही खाता असा टोला टीका करणाऱ्यांना जितेंद्र आव्हाडांनी लगावला.
'तो' निकाल दिल्लीतून आला होता
विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हा दिल्लीतून टाईप करून आलेला आहे. त्यामुळे या निकालपत्रात इतक्या उणीवा आहेत जिथे सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंचा व्हिप मान्य केला. गोगावलेंना रद्दबातल ठरवले. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे यांची सभागृह नेता म्हणून झालेली नेमणूकही कोर्टाने रद्द केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी अशाप्रकारे निर्णय देणे अपेक्षित नव्हते. आता पुढे काय होतंय बघू असं आव्हाड म्हणाले.