इंदिरा गांधी यांच्या संदर्भातील वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा वेळीच खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 01:03 PM2020-01-30T13:03:35+5:302020-01-30T13:04:25+5:30
इंदिरा गांधी यांच्याबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतीकारी होते, पण आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकते. मात्र त्याचवेळी इंदिराजी आणि मोदी-शाह यांची तुलना होऊ शकत नाही, अस आव्हाड ट्विट करून म्हणाले.
मुंबई - भाजपला शिंगावर घेणारे आणि आपल्या सडेतोड भुमिकेसाठी चर्चेत असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर आपल्या वक्तव्याचा खुलासा करण्याची वेळ आली आहे. बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर त्यांनी खुलासा केला आहे.
इंदिरा गांधी यांनी असाच एकेकाळी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याविरुद्ध कोणीही बोलण्यास तयार नव्हते. मात्र जयप्रकाश नारायण यांनी याविरुद्ध आवाज उठवला. त्याचा परिणाम झाला आणि इंदिरा गांधी यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेसमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी आव्हाड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच इंदिराजी यांनी देशाची एकता आणि अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावले. त्या जगात एक कणखर व्यक्ती म्हणून परिचीत आहेत. आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर वेळीच खुलासा केला ते बरं झालं. मात्र आमच्या नेत्यांचा अनादर केल्यास प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा अशोक चव्हाण यांनी ट्विट करून दिला आहे.
देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. @Awhadspeaks यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 29, 2020
या संदर्भात खुलासा करताना आव्हाड म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्याबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतीकारी होते, पण आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकते. मात्र त्याचवेळी इंदिराजी आणि मोदी-शाह यांची तुलना होऊ शकत नाही, असही आव्हाड ट्विट करून म्हणाले.
इंदिरा गांधी ह्यांच्या असामान्य कर्तुत्वा बद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 29, 2020
त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणिबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळ. पास हि पोहचू शकत नाही pic.twitter.com/X97RZK9J9o