'जीतकर हारनेवालों को 'खोके सरकार' कहते है', आदित्य ठाकरेंची शाहरुख स्टाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 05:03 PM2022-09-14T17:03:59+5:302022-09-14T17:05:20+5:30
माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली.
मुंबई - वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा (vedanta semiconductor) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. दरम्यान, हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजीगुजरातल्या नेण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसंच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेतून पुन्हा शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बाजीगर चित्रपटातील डॉयलॉगचाही संदर्भ दिला.
माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. फॉक्सकॉनबाबत व्हॉट्सअॅपवर खोटो मेसेज फिरवण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी अद्याप सविस्तर उत्तर दिलं नाही. सरकारने खुलासाही केला नाही. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला?, याचं उत्तर मिळालं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच ४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून प्रकल्प मागे राहिला. हे घडलं तेव्हा मुख्यमंत्री गणेश दर्शनात व्यस्त होते. त्यामुळे आता तरुणांच्या बेरोजगारीची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरेंनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर पटलवार करत त्यांना सवाल केला आहे. उद्योगमंत्र्यांना त्यांचं खातं थोडंस चुकीचं ब्रीफ करत आहे. त्यांनी थोडा अभ्यास करावा, त्याचं मत्रालय थोडं वेगळं होत. त्यांनी देसाईसाहेबांचं किंवा माझं ट्विटर पाहिलं असतं, काम बघितलं असतं तर त्यांना ते कळालं असतं किवा ते तिथे गेलेही नसते, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांच्यावर पलटवार केला, तसेच, बाजीगर चित्रपटातील एक डॉयलॉग होता, हारकर जीतनेवाले को बाजीगर कहते है. पण, इथे जितकर हारनेवालें को खोके सरकार कहते है, असे म्हणत वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यामुळे शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
‘तोडीस तोड प्रकल्प देणार’ - सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सदर प्रकरणावर एक महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असं नरेंद्र मोदींनी फोनवर म्हटल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
वेदांताकडून स्पष्टीकरण
“सर्व राज्यांमध्ये आमचे लोक गेले. केपीएमजी, आमची फॉक्सकॉनचीही टीम गेली. त्यांनी गुजरातला पसंती दिली. कोणत्याही परिस्थितीत असं समजू नका की हे सर्व नरेंद्र मोदींनी केलं आहे. आमच्या इंडिपेंडंट एजन्सीनं असं ठरवलं की गुजरातच असं एक राज्य आहे ज्याने सिलिकॉन पॉलिसी सर्वात पहिले सुरू केली,” असं अग्रवाल म्हणाले.