जेजे रूग्णालयातून चिमुरडी हरवली बेस्ट कंडक्टरच्या प्रसंगावधानाने सुखरूप सापडली
By admin | Published: May 10, 2014 07:41 PM2014-05-10T19:41:39+5:302014-05-10T21:05:44+5:30
बेस्ट कंडक्टरच्या प्रसंगावधानाने जेजे रूग्णालयातून हरविलेली ९ वर्षांची गतीमंद मुलगी तिच्या पालकांकडे सुखरूप पोहचली.
मुंबई - बेस्ट कंडक्टरच्या प्रसंगावधानाने जेजे रूग्णालयातून हरविलेली ९ वर्षांची गतीमंद मुलगी तिच्या पालकांकडे सुखरूप पोहचली.
सांताक्रूझ, कलिना परिसरात राहणारी ही चिमुरडी काल आपल्या मावशीसह जेजे रूग्णालयात आली होती. मावशीने या मुलीला संबंधीत रोगनिदान कक्षाबाहेरील रांगेत उभे केले आणि स्वत: काही कागदपत्रांची झेरॉक्स आणण्यासाठी गेली. पंधरा मिनिटे झाली तरी मावशी परत न आल्याने ही चिमुरडी घाबरली, बिथरली. रडत रडत, मावशीला शोधत ती रूग्णालयाबाहेर पडली आणि वरळीला जाणार्या बेस्टबसमध्ये चढली. दरम्यान, ही बस डॉकयार्ड रोड परिसरात आली तेव्हा प्रवाशांना तिकिटे देण्यात व्यस्त असलेला कंडक्टर या मुलीपर्यंत पोहोचला. त्याने या चिमुरडीला कुठले तिकिट देऊ, अशी विचारणा केली. मात्र तिला काहीच बोलता येत नसल्याने व ती रडू लागल्याने कंडक्टरने आपुलकीने तिची चौकशी केली. तुझे नाव काय, तू कुठून आलीस, कुठे जायचे आहे, सोबत नातेवाईक का नाहीत, असे प्रश्न त्याने या चिमुरडीला विचारून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने प्रसंगावधान राखून या मुलीला वरळी पोलीस ठाण्यात आणले.
तोपर्यंत या चिमुरडीच्या मावशीने अल्पवयीन भाची चोरीला गेल्याची बोंब ठोकत रूग्णालय डोक्यावर घेतले. प्रकरण जेजे पोलीस ठाण्यात पोहोचले. जेजे पोलिसंानी लागलीच मुलीचे वर्णनाचा बीनतारी संदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यात धाडला. त्यामुळे कंडक्टर मुलीला पोलीस ठाण्यात नेण्याआधीच वरळी पोलिसांना जेजे रूग्णालयातून अल्पवयीन मुलगी चोरीला गेल्याची माहिती मिळालेली होती. त्यामुळे लागलीच वरळी पोलिसंानी जेजे पोलिसांशी संपर्क साधून कंडक्टरने सोबत आणलेल्या मुलीची माहिती कळवली. पुढे वरळी पोलीस या चिमुरडीला घेऊन जेजे पोलीस ठाण्यात गेले. तेथे या मुलीला तिच्या मावशीच्या ताब्यात देण्यात आले. हा सर्व थरार अवघ्या तासाभरात रंगला.
बेस्ट कंडक्टरच्या प्रसंगावधानाने ही चिमुरडी सुखरूपपणे आपल्या नातेवाईकांकडे परतल्याची प्रतिक्रिया जेजे मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक शशिकांत सुर्वे यांनी व्यक्त केली.