पुणे विद्यापीठात लवकरच ज्ञानमंडळ
By admin | Published: April 27, 2016 06:55 AM2016-04-27T06:55:01+5:302016-04-27T06:55:01+5:30
मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी नुकतेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा मुंबई विद्यापीठात १० ज्ञानमंडळांची स्थापना केली.
मुंबई : मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी नुकतेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा मुंबई विद्यापीठात १० ज्ञानमंडळांची स्थापना केली. याच धर्तीवर लवकरच पुणे विद्यापीठातही ज्ञानमंडळे स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विश्वकोश अद्ययावत करण्याच्या प्रकल्पाला गतीमान पद्धतीने सुरुवात होणार आहे.
जगातील विविध विषयांतील ज्ञान मराठीत आणण्यास विश्वकोश मंडळाने ही ज्ञानमंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या रचनेमध्ये पाच तज्ज्ञांचे सल्लागार मंडळ व एक समन्वयक यांचा समावेश असेल. हे ज्ञानमंडळ महाराष्ट्रातील त्या विषयासंबंधातील लेखकांचा शोध त्यांच्या मदतीने नोंदींच्या लिखाणाचे व अद्ययावतीकरणाचे काम करेल.
या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून प्राथमिक टप्प्यावर अद्ययावत करण्यासाठी क्षेत्रांची नेमणूक करण्यात येईल. वीस खंडांच्या नोंदींचे अद्ययावत करणे, विविध विषयांवरील नव्या माहितीची सातत्याने भर टाकणे यासाठी ज्ञानमंडळाची स्थापना करून प्रत्येक उपविषयासाठी स्वतंत्र ज्ञानमंडळ स्थापन करून ही सर्व ज्ञानमंडळे एकमेकांशी जोडून त्या आधारावर विश्वकोशाची रचना करण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात येणार आहे.