JNU Attack: हल्लेखोर बुरखाधाऱ्यांचे चेहरे समोर यायला हवेत- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 01:52 PM2020-01-06T13:52:58+5:302020-01-06T14:09:23+5:30

हल्लेखोरांना तोंड लपवण्याची गरज का भासली; मुख्यमंत्र्यांचा सवाल

jnu attack the faces of attackers should come in front of public says cm uddhav thackeray | JNU Attack: हल्लेखोर बुरखाधाऱ्यांचे चेहरे समोर यायला हवेत- उद्धव ठाकरे

JNU Attack: हल्लेखोर बुरखाधाऱ्यांचे चेहरे समोर यायला हवेत- उद्धव ठाकरे

googlenewsNext

मुंबई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात हिंसाचार घडवणाऱ्या बुरखाधाऱ्यांचे चेहरे समोर यायला हवेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. चेहरे लपवून हल्ले घडवणारे भेकड आहेत. त्यांच्यात इतकी हिंमत आहे तर मग ते तोंडावर मुखवटे लावून का फिरतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई होऊन हल्लेखोरांचे चेहरे देशासमोर यायला हवेत. हा संपूर्ण प्रकार कोणाच्या पाठिंब्यानं झाला ते पुढे कळेलच. त्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.

जेएनयूमध्ये काल हिंसाचार झाला. काही बुरखाधाऱ्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांवर हल्ले केले. हे बुरखाधारी अतिशय भित्रे आहेत. त्यांच्यात इतकी हिंमत होती, तर त्यांना तोंड लपवायची गरज का भासली, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात पोलिसांची भूमिका निष्पक्ष वाटत नाही. मला यामध्ये राजकारण आणायचं नाही. पण बुरख्यामागचे चेहरे समोर यायला हवेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

जेएनयूसारखी परिस्थिती राज्यात निर्माण होऊ देणार नाही. राज्यातील एकाही विद्यार्थ्याच्या केसाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातल्या परिस्थितीबद्दल तरुणांच्या मनात भीती आणि राग आहे. देशातला तरुण कोणालाही घाबरत नाही. तरुणांच्या मनात असलेला उद्रेक माझ्याही मनात आहे. मी देशातल्या तरुणाईसोबत आहे. केंद्र सरकारनं तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा परिस्थिती बिकट होईल, असा इशारादेखील मुख्यमंत्र्यांनी दिला. 
 

Web Title: jnu attack the faces of attackers should come in front of public says cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.