नोकरीच्या आमिषाने ३०० तरुणांना ७५ लाखांना गंडवले
By Admin | Published: August 22, 2016 08:09 PM2016-08-22T20:09:26+5:302016-08-22T20:09:26+5:30
नोकरी देणा-या संकेतस्थळाच्या माध्यमातून तरुणांना आयटी कंपनीमध्ये नोक-या असल्याचे आमिष दाखवत त्यांना प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने ३०० तरुणांची तब्बल ७५ लाखांची फसवणूक करण्यात आली
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २२ : नोकरी देणा-या संकेतस्थळाच्या माध्यमातून तरुणांना आयटी कंपनीमध्ये नोक-या असल्याचे आमिष दाखवत त्यांना प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने ३०० तरुणांची तब्बल ७५ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या तरुणांकडून बॉंड स्वरुपात करारनामा लिहून घेत प्रत्येकी ७५ हजार रुपये उकळल्यानंतर रात्रीतून गाशा गुंडाळत कंपनीचे सर्व पदाधिकारी पसार झाले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फरीन कोसर , प्रतिमा गोखले, दिपांशी बनवारी (सर्व रा. येरवडा), पंकज कुमार सिंह, छाया सिंग, यशराज सिंग (सर्व रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अन्वर युनूस खान (वय २४, रा. काळा खडक, भुमनगर चौक, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान नोकरी शोधत असताना त्यांनी नोकरी डॉट कॉम, इन्फोनोकरी डॉट कॉम, फर्स्टनोकरी डॉट कॉम या संकेतस्थळांवर नाव नोंदवले होते. त्यावर त्यांच्या ईमेलवर नोकरीच्या आॅफर्स येतही होत्या. त्यामध्ये पी. सी. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये नोकरी असल्याचे नमूद करण्यात आले होते. खान यांनी ईमेलमध्ये नमूद मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.
सविता नावाच्या महिलेने त्यांना शैक्षणिक माहिती विचारुन घेत दुस-या दिवशी मुलाखतीसाठी बोलावले. कल्याणीनगरच्या कुमार सेरीब्रम आयटी पार्कमध्ये त्यांची मुलाखत प्रतिमा गोखले यांनी घेतली. त्यानंतर एच. आर. राऊंडमध्ये फरीन कोसर हिने त्यांची मुलाखत घेतली. कंपनीचे मुख्य कार्यालय देहरादुन येथे असून देशात आठ शाखा असल्याचे सांगत त्यांना विविध प्रोजेक्टची माहिती दिली. कंपनीसोबत २५ हजार रुपयांचा बॉंड करुन घेतल्यावर हे पैसे नोकरीवर रुजू झाल्यावर एक वर्षाने मिळतील असे त्यांना सांगण्यात आले. तसेच ९० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी दरमहा स्टायपेंड देणार असल्याचे सांगितले. परीक्षेनंतर पगाराचे ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले.
२५ जून २०१६ रोजी खान यांच्यासह १२० जणांना कामावर बोलावण्यात आले. त्यावेळी गोखले आणि बनवारी यांनी कंपनीची माहिती देत पंकज कुमार, छाया सिंग आणि यशराज हे कंपनीचे मालक असल्याचे सांगितले. त्यानंतर ११ जुलै रोजीपासून त्यांचे प्रशिक्षण सुरु झाले. खान यांच्या बॅचमध्ये ४५ मुले होती. अशा वेगवेगळ्या बॅचेसमध्ये एकूण ३०० मुले होती. सुरुवातीला व्यवस्थित प्रशिक्षण दिल्यानंतर लाईव्ह प्रोजेक्ट देण्यास टाळाटाळ करण्यात येऊ लागली.
कंपनीकडे कोणतेही प्रोजेक्ट नसल्याचे तसेच लवकरच कंपनी बंद होणार असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, वायरिंग आणि वीज दुरुस्तीचे काम निघाल्याचे कारण देत १३ आॅगस्ट ते २१ आॅगस्ट अशी सुटी देण्यात आली. या दरम्यान, कंपनीने गाशा गुंडाळलेला होता. कंपनीचे अकाऊंटंट स्वप्नील रावडे यांनी मालकांनी सर्व पैसे खात्यावरुन काढून घेतल्याचे सांगितले. त्यांचे फोनही बंद येत होते. कंपनीचे संकेतस्थळही बंद करण्यात आलेले होते.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्व तरुणांनी रामवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. विद्यार्थ्यांच्यावतीने खान यांनी फिर्याद दाखल केली असून येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक ई. डी. जगदाळे करीत आहेत.