वॉर्डबॉय ते सायंटिस्ट सगळ्यांना नोकऱ्या; महारोजगार मेळाव्यात ८००० जागांसाठी मुलाखती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 06:54 AM2022-12-04T06:54:59+5:302022-12-04T06:55:16+5:30
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये शनिवारी विद्यार्थी आणि नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी महारोजगार मेळावा आयोजित केला होता
मुंबई : दहावी-बारावी पास-नापास उमेदवार, पदवी-पदविकाधारक, विविध शाखांमधील अभियंते, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी, अगदी टेली कॉलर, वॉर्डबॉयपासून ते मॅनेजमेंट, आयटी, विज्ञान पदवीधारक, मीडिया आणि एंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी उमेदवारांनी शनिवारी कौशल्य विकास विभागाकडून मुंबईत आयोजित महारोजगार मेळाव्यात मुलाखती दिल्या.
मेळाव्यात सहभागी विविध कॉर्पोरेट कंपन्या, उद्योगांमध्ये मिळून ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी उमेदवारांनी मुलाखती दिल्या. शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत साधारण २ हजार उमेदवारांनी या नोकऱ्यांसाठी या मेळाव्यात सहभाग घेतला. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये शनिवारी विद्यार्थी आणि नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी महारोजगार मेळावा आयोजित केला होता. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी कौशल्य विकास विभागाद्वारे कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील, असे स्पष्ट केले.
पं. दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन मुंबईतील एल्फिन्स्टन विद्यालयात करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागातर्फे आयोजित या मेळाव्यास 2000+ उमेदवारांनी हजेरी लावली!
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) December 3, 2022
राज्यात अशाप्रकारे 300 मेळावे आयोजित करुन 5 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा संकल्प आहे. pic.twitter.com/4g9NXKKpaJ
स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन
विविध कंपन्या आणि महामंडळाचा सहभाग टीएनएस एंटरप्राइजेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्व्हिसेस, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, बझवर्क्स बिजनेस सर्व्हिसेस, युवाशक्ती स्किल इंडिया, युनिकॉर्न इन्फोटेक, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेस, करिअर एंट्री, टीम हायर अशा २० हून अधिक कंपन्यांनी मुलाखती घेतल्या. मेळाव्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ,अशा ११ महामंडळांनी सहभाग घेतला.
महास्वयम ॲप उपलब्ध करून देणार
विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम राबवत आहे. त्यानुसार राज्यात १ लाख २५ हजार रोजगार देण्यासाठी विविध कंपन्यांबरोबर विभागाने सामंजस्य करार केले आहेत. येत्या काळात राज्यभरात असे ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे. उद्योग आणि बेरोजगार उमेदवारांमध्ये समन्वय साधण्यासाठी येत्या दोन महिन्यांत मोबाईलवर महास्वयम ॲप उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी घोषित केले.