कोरोना व अन्य कारणाने मरण पावलेल्या आठ कर्मचाऱ्यांच्या वारसांना पालिका सेवेत नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 12:53 PM2021-07-29T12:53:38+5:302021-07-29T12:54:09+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या कायम सेवेतील ८ कर्मचाऱ्यांचे कोविड किंवा इतर कारणांमुळे निधन झालेल्यांच्या वारसांना शासन नियमानुसार महापालिका सेवेत सामावून घेतले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड: मीरा भाईंदर महापालिकेच्या कायम सेवेतील ८ कर्मचाऱ्यांचे कोविड किंवा इतर कारणांमुळे निधन झालेल्यांच्या वारसांना शासन नियमानुसार महापालिका सेवेत सामावून घेतले जाणार आहे. नियुक्ती पत्र देणेपुर्वी त्यांना वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र सादर करणेबाबतचे पत्र महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते बुधवारी देण्यात आले.
अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या मयत कर्मचाऱ्यांची ८ मार्च व ५ एप्रिल रोजी प्रतिक्षासूची करून एकूण ३० उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यापैकी ८ दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र नातेवाईकास वारसा अनुकंपा तत्वावर महापालिकेत सामावुन घेतले जाणार आहे. त्यात कोविडमुळे मयत झालेल्या महापालिकेच्या ३ कर्मचा-यांचे वारस आहेत.
कोविड व इतर आजाराने निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसां मध्ये वैशाली सारुक्ते यांना शिपाई पदावर, सुनिता सोनावणे यांना लिपिक - टंकलेखक, रोशन गावडे यास शिपाई तर सिध्देश मंजुळे, पोर्णिमा वंजारी, विकास जाधव, मिथुन पवार व सागर केणी या ५ जणांना मजूर पदावर सेवेत सामावून घेतले आहे.
यावेळी उपमहापौर हसमुख गहलोत, स्थायी समिती सभापती दिनेश जैन, सभागृह नेता प्रशांत दळवी, गटनेत्या निलम ढवण, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त मारुती गायकवाड, उपायुक्त संजय शिंदे आदी उपस्थित होते.