जोगेश्वरीचे फाटक पुन्हा खुले

By Admin | Published: October 19, 2016 02:14 AM2016-10-19T02:14:52+5:302016-10-19T02:14:52+5:30

प्रवाशांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या जोगेश्वरी स्थानकातील रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला होता.

Jogeshwari's gates were opened again | जोगेश्वरीचे फाटक पुन्हा खुले

जोगेश्वरीचे फाटक पुन्हा खुले

googlenewsNext


मुंबई : प्रवाशांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या जोगेश्वरी स्थानकातील रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला होता. मात्र तीन दिवस उलटत नाही तोच प्रवाशांच्या मागणीनंतर फाटक पुन्हा खुले करण्यात आले. स्थानकात असलेल्या पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागत असल्याने प्रवाशांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
जोगेश्वरी स्थानकाच्या चर्चगेट दिशेला रेल्वे फाटक आहे. रेल्वे मार्गाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी या फाटकातूनच जावे लागते. फाटकातून जातानाच आणि रूळ ओलांडताना दोन्ही दिशेच्या टोकांना वळण आहे. त्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या ट्रेन प्रवाशांना समजत नाहीत आणि प्रवाशांना अपघातांना सामोरे जावे लागते. दर दिवशी एक ते दोन प्रवाशांचा येथे अपघात होत असल्याने पश्चिम रेल्वेने १५ आॅक्टोबरपासून फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी आणि रविवारी गर्दी नसल्याने फाटक बंद करण्याच्या निर्णयाचा परिणाम दिसून आला नाही. सोमवारी कामाचा दिवस असल्याने जोगेश्वरी स्थानकातील प्लॅटफॉर्म तसेच पादचारी पुलावर एकच गर्दी उसळली. या गर्दीतून वाट काढताना प्रवाशांना बराच मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे प्रवाशांनी स्टेशन मास्तरांकडे फाटक उघडण्याची मागणी केली. स्थानकात गर्दीमुळे प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि अपघाताचा धोका पाहता अखेर रेल्वेने फाटक उघडण्याचा निर्णय घेतला. या स्थानकाच्या दक्षिण दिशेकडील पादचारी पूल स्थानकाबाहेर पूर्व व पश्चिम दिशेला उतरवण्याचे काम एमआरव्हीसी करत आहे. हे काम पूर्ण झाल्यावरच फाटक बंद करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Jogeshwari's gates were opened again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.