मतदानासाठी ‘जोगवा’, दार उघड, राजा दार उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 03:18 AM2019-04-29T03:18:15+5:302019-04-29T06:22:37+5:30

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यासाठीचे मतदान आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर, मतदारांना केलेले हे कळकळीचे आवाहन...

'Jogwa' for voting, Opening the door, the King's door open | मतदानासाठी ‘जोगवा’, दार उघड, राजा दार उघड

मतदानासाठी ‘जोगवा’, दार उघड, राजा दार उघड

googlenewsNext

- अभय नरहर जोशी

दार उघड राजा दार उघड
मतदारराजा दार उघड

रणरणता उन्हाळा आहे, मान्य
दाहक दुष्काळही आहे, मान्य
पण तुझं घरी राहणं अमान्य
मतदानाला न जाणं अमान्य
म्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघड
मतदारराजा दार उघड - १

नेत्यांचा ‘गोंधळ’ घालून झाला
मतांचा ‘जोगवा’ मागून झाला
‘भारुडं’ भाषणांची ऐकून झाली
आता निर्णयाची वेळ आली
म्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघड
मतदारराजा दार उघड - २

‘सब घोडे बारा टक्के’ म्हणत
मतांचे टक्के बसशील घटवत
मान्य, जरी तुझा हा त्रागा भाऊ
अरे पण ‘दगडापेक्षा वीट मऊ’
म्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघड
मतदारराजा दार उघड - ३

‘भाऊ’, ‘दादा’, ‘ताई’, ‘अप्पा’
यांनी घातल्या तुला आर्त हाका
दिल्लीत उभा राहील जो बुलंद
त्यालाच कर ‘ईव्हीएममध्ये बंद’
म्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघड
मतदारराजा दार उघड - ४

‘देश आपला बदलला पाहिजे’
‘गाव आपलं बदललं पाहिजे’
कसं चालेल असं नुसतं म्हणून
बाहेर न पडता घरात बसून
म्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघड
मतदारराजा दार उघड - ५

एका मताने फरक पडेल काय
म्हणून निराश होतोस काय?
जरी असेल तुझा खारीचा वाटा
तयार होतील विकासवाटा
म्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघड
मतदारराजा दार उघड - ६

निघून जाण्यापूर्वी अमूल्य वेळ
काढ तू तुझा थोडासा वेळ
पुढची तब्बल वर्षे पाच
तुलाच होईल ‘त्यांचा’ जाच
म्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघड
मतदारराजा दार उघड - ७

शांत हो आणि कर विचार
वेळ नाही तुझ्याकडे फार
मतदानाचा दिवस तुझ्या हाती
दे सत्ता तू शहाण्या हाती
म्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघड
मतदारराजा दार उघड - ८
 

Web Title: 'Jogwa' for voting, Opening the door, the King's door open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.