जॉन्सन अँड जॉन्सनच्या चुकीचा राज्यातील ३४८ रुग्णांना फटका; सदोष प्रत्यारोपणाचा करणार तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 01:51 AM2018-09-08T01:51:13+5:302018-09-08T01:51:50+5:30
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या चुकीचा राज्यातील ३४८ रुग्णांना फटका बसला आहे. सदोष उपकरणांद्वारे ‘हिप’ (खुबा) प्रत्यारोपण झालेल्या या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.
मुंबई : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या चुकीचा राज्यातील ३४८ रुग्णांना फटका बसला आहे. सदोष उपकरणांद्वारे ‘हिप’ (खुबा) प्रत्यारोपण झालेल्या या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.
कंपनीने प्रत्यारोपण उपकरणांची भारतात विक्री केली, पण त्यातील दोषांमुळे रुग्णांच्या रक्तात विषजन्य घटक पसरले. काहींना कायमचे अपंगत्व आले. त्याबद्दल रुग्णांना २० लाख रुपये भरपाईचे आदेश केंद्रीय औषधे प्रमाणिकरण संघटनेने कंपनीला दिले. देशातील ४,७०० पैकी ३,६०० रुग्णांचा शोध सुरू असून, ३४८ रुग्ण महाराष्टÑातील आहेत.
रुग्णांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकार विशेष समिती स्थापना करणार आहे. या समितीमध्ये दोन अस्थिव्यंग तज्ज्ञ, एक रेडिओलॉजिस्ट व अन्न-औषधे प्रशासनातील अधिकाऱ्याचा समावेश असेल. राज्याचे औषधे नियंत्रक अमृत निखाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, काही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणे आव्हान असेल. त्या रुग्णांना प्रत्यारोपणानंतर कुठला त्रास झाला, त्याची तपासणी करायची आहे.
अशी मिळेल नुकसान भरपाई
- रुग्णांनी सीडीएससीओकडे अर्ज करणे. सीडीएससीओची केंद्रीय तज्ज्ञ समिती ३० दिवसांत निर्णय घेऊन अर्ज राज्याच्या समितीकडे पाठवेल.
- राज्य समिती ६० दिवसांत त्यावर निर्णय घेईल.
- समितीच्या शिफारशीनुसार तज्ज्ञ समिती भरपाईची रक्कम निश्चित करेल. भरपाई देण्याबाबत सीडीएससीओ कंपनीला निर्देश देईल.
- कंपनीकडून रुग्णाला भरपाईची रक्कम मिळेल. कंपनीने टाळाटाळ केल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालय कारवाई करेल.