जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीला १६ लाखांचा दंड; ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 10:22 AM2022-11-22T10:22:59+5:302022-11-22T10:26:09+5:30
या कंपनीने, ओआरएसएल-रिहायड्रेट, ओआरएसएल-रेडी तो ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन, ओआरएसएल-प्लस ए रेडी टू ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन, ओआरएसएल-एफओएस रेडी टू ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन या चार अन्नपदार्थांची (पेयांची) विविध आजारांच्या उपचारांसाठी आवश्यकता असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती.
मुंबई : औषध असल्याचा दावा करून ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने मे जॉन्सन ॲण्ड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला १६ लाखांचा दंड ठोठावला आहे. या कंपनीने अन्न या वर्गवारीत मोडणाऱ्या ‘ओआरएसएल’ पेयांची जाहिरात केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या कंपनीने, ओआरएसएल-रिहायड्रेट, ओआरएसएल-रेडी तो ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन, ओआरएसएल-प्लस ए रेडी टू ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन, ओआरएसएल-एफओएस रेडी टू ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन या चार अन्नपदार्थांची (पेयांची) विविध आजारांच्या उपचारांसाठी आवश्यकता असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांनी कंपनीस नोटीस देऊन सखोल चौकशी केली. चौकशीअंती प्रत्येक प्रकरणनिहाय चार लाखांचा असा एकूण १६ लाखांचा दंड ठोठावला.
‘दिशाभूल कराल तरी कारवाई होईल’
कायद्यातील तरतुदीकडे दुर्लक्ष करून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या अन्न व्यावसायिक विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिला आहे.