राजन वेळुकर विद्यापीठात रुजू
By Admin | Published: March 9, 2015 06:02 AM2015-03-09T06:02:13+5:302015-03-09T06:02:13+5:30
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळुकर यांना पुन्हा पदावर रुजू होण्याचे आदेश गुरुवारी राज्यपालांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी कुलगुरुंनी आपल्या पदाचा
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळुकर यांना पुन्हा पदावर रुजू होण्याचे आदेश गुरुवारी राज्यपालांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी कुलगुरुंनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी वेळुकर यांना पदावरुन दूर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवसांमध्येच सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. न्यायालयाचे आदेश येताच वेळुकर यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानुसार गुरुवारी राज्यपालांनी वेळुकरांना पुन्हा पदावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. कार्यालयात येऊन वेळुकरांनी महत्त्वाच्या आणि प्रलंबित प्रश्नांविषयी विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांविषयी सोमवार ९ मार्च रोजी परीक्षा कमिटीची बैठक आयोजित केली आहे. वेळुकरांच्या जागी प्रभारी कुलगुरू म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू नरेश चंद्र यांची नेमणूक करण्यात आली होती. वेळुकर पुन्हा विद्यापीठात रुजू झाल्याने त्यांनी आपल्या पदापासून नरेश चंद्र यांना मुक्त केले. आता नरेश चंद्र विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. (प्रतिनिधी)