काँग्रेसशी हातमिळवणी करुन 18 जिल्हापरिषदमध्ये राष्ट्रवादी सत्तेत
By admin | Published: February 26, 2017 08:04 PM2017-02-26T20:04:05+5:302017-02-26T20:04:05+5:30
राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेससोबत राष्ट्रवादी आघाडी करु, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 26 : राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेससोबत राष्ट्रवादी आघाडी करु, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाली आहे. आघाडी झाली तर राज्यातल्या 17 ते 18 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता येईल. मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो, असं पवार म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवडणुकांनंतरचं वर्तन पाहता ते सत्तेतून बाहेर पडतील, असं वाटत नाही. पण बाहेर पडले तर मध्यावधी निवडणुकांना जाण्यासाठी सज्ज आहोत, असंही पवार म्हणाले. राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये युती करण्यासाठी ते अशोक चव्हाण यांची भेट घेण्यासाठी नांदेड येथे आले होते. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आघाडीसाठी शरद पवारांनी काँग्रेसबरोबरच्या आघाडीला संमती दर्शवली आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मिळालेली मते पाहता स्वबळावर काँग्रेस केवळ 1 तर राष्ट्रवादी काँग्रेस 3 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करु शकतात. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर एकत्र आले, तर राज्यभरात तब्बल १७ ते १८ जिल्हा परिषदांमध्ये आघाडीची सत्ता येऊ शकते. मग 1ते 3 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करायची की 17, 18 याबाबत निर्णय घ्यावा लागेल असे पवार म्हणाले.