जनताभिमुख अधिकारी महत्त्वाचे
By admin | Published: April 5, 2017 01:01 AM2017-04-05T01:01:08+5:302017-04-05T01:01:08+5:30
अधिकाऱ्यांवर विश्वास टाकल्यास ते झोकून काम करतात असा माझा अनुभव आहे.
पुणे : अधिकाऱ्यांवर विश्वास टाकल्यास ते झोकून काम करतात असा माझा अनुभव आहे. किल्लारी भूकंप, मुंबई बॉम्बस्फोट अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनातील सर्व व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. अनेकदा राजकारण्यांनी सांगितलेली कामे तर प्रशासनातील अधिकाऱ्यांना करावीच लागतात मात्र, जनतेची गरज ओळखून तसे निर्णय सरकारला घ्यायला लावणारे अधिकारी अधिक महत्त्वाचे असल्याचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे सांगितले.
माजी प्रशासकीय अधिकारी श्याम देशपांडे लिखित ‘सदसद्विवेक’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवक भाई वैद्य, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, आ. ह. साळुंके या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘प्रशासकीय यंत्रणेला विश्वास दिल्यास, तेदेखील तुम्हाला कामाचा विश्वास देतात. संकटकाळात प्रशासन कशा पद्धतीने काम करते, हे आपण पाहिले आहे. अगदी प्रशासनाच्या तळातील कर्मचाऱ्यांपासून अधिकारी वर्गदेखील तहान-भूक आणि कुटुंब विसरून काम करीत असतो.’’
सबनीस म्हणाले, ‘‘आजची राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेची घसरगुंडी सुरू आहे. त्यामुळे सध्या निरपेक्ष प्रशासकाची देशाला आवश्यकता आहे.’’ (प्रतिनिधी)
>फडणवीस आणि
पवारांची फिरकी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालकांना आपले नाव काय अशी विचारणा शरद पवार यांनी केली. तिकडून उत्तर आले (शुभदा) फडणवीस. पवारांनी मिश्किलपणे डोळे वर करीत, नागपूर ? अशी विचारणा करताच हशा पिकला. त्यानंतर ते म्हणाले अनेक कार्यक्रमांत वक्त्यांची ओळख करून दिली जाते. अनेकदा त्या वक्त्यांनाही माहीत नसलेले उल्लेख (शब्दपेरणी) त्यात असतात. वक्त्यांचे भाषण झाल्यावरही काही वक्ते काय बोलले हे थोडक्यात सांगतो. बहुधा सूत्रसंचालकाने गृहीत धरलेले असते, भाषण श्रोत्यांच्या डोक्यावरून गेलेले आहे. पवारांच्या या वक्तव्यावरून कार्यक्रमाचा नूर एकदम पालटला. एक हास्याची लकेर सभागृहत पसरली.
>समाजात असलेले सर्व दोष प्रशासनातदेखील दिसून येत आहेत. यात अपवाददेखील असतात. मात्र, आता या अपवादांचीदेखील संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे समाजाचे पुढे काय होईल, याबाबत चिंता लागून राहिली आहे. खरेतर प्रशासन खंबीर हवे. प्रसंगी जरूरी असल्यास राजकीय व्यक्तींनी केलेल्या मतापेक्षा वेगळे मत व्यक्त करायला हवे. प्रशासनाने समाजाशी एकरूप व्हायला हवे, पण ही मूल्ये आता उरली नाहीत.
- भाई वैद्य, ज्येष्ठ समाजसेवक