डम्पिंग ग्राउंडसाठी संयुक्त समिती - मुख्यमंत्री
By admin | Published: February 8, 2016 04:25 AM2016-02-08T04:25:50+5:302016-02-08T04:25:50+5:30
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील विकासकामांवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच तेथील समस्या दूर करण्यासाठी स्थानिक नागरिक, राज्य सरकार आणि महापालिका प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडवरील विकासकामांवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच तेथील समस्या दूर करण्यासाठी स्थानिक नागरिक, राज्य सरकार आणि महापालिका प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
डम्पिंग ग्राउंडची समस्या सोडविण्याची मागणी करत चेंबूर येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी स्थानिकांनी आपल्या अडचणींचा पाढाच मुख्यमंत्र्यासमोर वाचून दाखविला. यावर, मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना त्वरित कालबद्ध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
देवनार येथे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्हीकॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सोमवारी पूर्ण केले जाईल. तसेच भविष्यात आगीच्या घटना आटोक्यात राहाव्यात यासाठी देवनार डम्पिंग ग्राउंडजवळ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या कामयस्वरुपी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच देवनार डम्पिंग ग्राउंडच्या सुरक्षाभिंतींच्या डागडुजीचे काम तातडीने पुर्ण केले जात असून वैज्ञानिक पद्धतीने कच-याची विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात येत असल्याचे मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. देवनार येथील उपाययोजनांचा कामांचा आढावा घेण्यासाठी स्थानिक नागरिक, राज्य सरकार आणि महापालिका प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी चेंबूरकरांच्या शिष्टमंडळाला दिले.