सारांश: आम्ही सगळे राहतो एकत्र आनंदाने...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:23 AM2022-05-15T11:23:36+5:302022-05-15T11:24:31+5:30
अलीकडच्या काही बातम्या कुटुंब व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करायला लावतात. आजच्या कुटुंब दिनानिमित्त जाणून घेऊ काही एकत्रित कुटुंबांबद्दल...
बाळासाहेब बोचरे, उपमुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई
आयुष्यभर कमावलेल्या इस्टेटीवरून मुलांमध्ये निर्माण झालेले कलह आणि त्यातून कुटुंबकर्त्यांची होणारी ससेहोलपट पाहता वृद्धापकाळ हा कुटुंब व्यवस्थेचा ढासळलेला बुरूजच म्हणता येईल. इस्टेटीसाठी मुलाने बापाचा खून केला. बापाने मुलाचा खून केला. अगदी उच्चशिक्षित मुलांनीही आईवडिलांना घराबाहेर काढले. मुलींनी आईला घराबाहेर काढले. या अलीकडच्या बातम्या सुन्न करणाऱ्या असून कुटुंब व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या आहेत. त्याचवेळेला काही कुटुंबे पिढ्यान् पिढ्या एकत्रितरित्या राहत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील बेंबळे (ता. माढा) येथील पोपट नामदेव अनपट या शेतकऱ्याचे ३० जणांचे कुटुंब म्हणजे शेती व्यवस्थापन आणि कुटुंब व्यवस्थापन याचा उत्तम नमुना आहे. या कुटुंबाची २५० एकर शेती आहे. त्यामध्ये ऊस, केळी, डाळिंब याबरोबर हंगामी पिके घेतली जातात. पोपट अनपट यांच्यासह त्यांचे चार भाऊ मिळून दहा जणांचे हे कुटुंब. त्या कुटुंबात १२ मुली आणि नऊ मुले वाढली. सर्व जावई हे उच्चशिक्षित आणि अधिकारीपदावर आहेत. सध्या २५० एकर शेती नऊ मुले पाहतात. नऊ जणांपैकी ज्यांना जितकी शक्य आहे, तेवढी त्याने सांभाळावी. त्यानुसार कोणी २० कोणी ३० एकर शेती सांभाळतो. नऊजणांपैकी दोघांची लग्ने झाली असून नातवंडेही आली आहेत. तर अजून सात सुना यायच्या आहेत.
अनपट कुटुंबाचे एकत्रित १५ खोल्यांचे मोठे घर आहे. मात्र आता जुने घर कमी पडू लागल्याने आणखी दोन बंगले बांधले आहेत. त्यामध्ये दोन विवाहित मुलांना ठेवले आहे.
पिकांचे नियोजन
आपापल्या क्षेत्रात कोणी काय उत्पादन घ्यायचे, याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे; पण, लागणारी खते, बियाणे, अवजारे व कृषी निविष्ठा एकत्रित खरेदी केल्या जातात. कोणी किती उत्पादन घेतले, किती टन ऊस काढला, याची चर्चा होते. त्याचा हिशेब स्वत: पोपट अनपट करतात. पोपट हे या कुटुंबाचे मुख्य कारभारी असून त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. कारभारी प्रत्येकाला भांडवल देतात. त्यानंतर किती उत्पन्न काढले, याचा जमाखर्च काढतात.
नव्या पिढीमध्ये विभक्तीचे वारे
बेंबळेच्या शेजारच्या परिते गावातही कोंडीबा लामकाने यांना दोन पत्नीपासून ११ मुले आणि सहा मुली मिळून सुमारे ७० जणांचे कुटुंब एकत्र राहत होते. मात्र अलीकडे या कुटुंबात मतभेद झाल्याने विभक्त झाले. मात्र वेगळे राहिले तरी कुटुंबातील एकोपा कायम आहे. या कुटुंबाकडे २०० एकर शेती असून अख्ख्या गावावर यांचा वचक आहे.
करकंब, ता. पंढरपूर येथील यशवंत गेना व्यवहारे यांचे सहा मुलांचे ४० जणांचे कुटुंब पण २० वर्षे कसलीच तक्रार नाही. यशवंत आप्पा यांचा शब्द प्रमाण मानून कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालू होता. या बळावर या कुटुंबाने शेती घेतली. मोठी प्रगती केली. आता आप्पांचे वय झाले. आणि कुटुंबातील नव्या रक्त जुन्यांकडे दुर्लक्ष करू लागल्याने हे कुटुंबही विभक्त झाले.