मंत्रालयातील सहसचिवानं स्वेच्छानिवृत्तीनंतर हाती घेतली 'मशाल'; विधानसभा निवडणूक लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 06:41 PM2024-09-03T18:41:25+5:302024-09-03T18:42:06+5:30
आज मातोश्रीवर पक्ष प्रवेश कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी खरात यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश दिला.
मुंबई - गेल्या काही वर्षात प्रशासनातून राजकारणात येणाऱ्यांची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यातच आणखी एका अधिकाऱ्याची भर पडली आहे. मंत्रालयातील सहसचिव पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेत अधिकाऱ्याने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्री इथं 'मशाल' हाती घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते उभे राहणार असल्याचं बोललं जातं आहे.
३ दशकांहून अधिक काळ मंत्रालयात सेवा बजावणारे गृह विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी अलीकडेच स्वेच्छानिवृत्ती घेतली. मंगळवारी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत खरात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. आज मातोश्रीवर पक्ष प्रवेश कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी खरात यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश दिला. या वेळी खा. अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत, बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर, आशिष रहाटे व जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .
सिद्धार्थ खरात यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्राम विकास विभाग, गृह विभागामध्ये सहसचिव म्हणून काम केले आहे. अनेक राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री व केंद्रीय राज्य मंत्री यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्याचे रहिवाशी असून त्यांनी आपली नोकरीची जबाबदारी सांभाळून गेली जिल्ह्यातील अनेक विकासकामात योगदान दिलं आहे.
कल्याणमधील नेत्यांचा प्रवेश, ठाकरे गटात नाराजी
कल्याणच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील साईनाथ तरे यांनीही उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. मात्र या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटातील कार्यकर्ते नाराज आहेत. निष्ठावंतांच्या निष्ठेचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या मनातील निष्ठा कायम राखण्यासाठी यापुढे असे प्रवेश करण्यात येऊ नये. गद्दार गटातून येणारी माणसे हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेसाठी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेमापोटी संघटनेत येत असतील तर त्यांच्या पापाचे प्रायश्चित म्हणून त्यांचे खरे उद्देश सिद्ध करण्यासाठी त्यांना पुढील १ वर्ष संघटनेचे कुठलेही पद देण्यात येऊ नये. येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांचा विचार करण्यात येऊ नये
याबाबतचे ठराव करून कल्याण जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरेंना शहरातील पदाधिकाऱ्यांनी दिले. मात्र कार्यकर्त्यांची ही नाराजी ओढावून उद्धव ठाकरेंनी साईनाथ तरे यांना पक्षात प्रवेश दिल्याने आगामी काळात ठाकरे गटाचे पदाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.