रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यासह पत्रकाराचा झाला मृत्यू
By admin | Published: May 12, 2017 05:10 PM2017-05-12T17:10:56+5:302017-05-12T17:10:56+5:30
भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील भैरुचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात आज (शुक्रवार) सकाळी उसाचा पाला काढायला गेलेल्या शेतकरी तरुणांवर रानगव्याने प्राणघातक हल्ला केला
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 12 : कोल्हापूरातील भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील भैरुचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात आज (शुक्रवार) सकाळी उसाचा पाला काढायला गेलेल्या शेतकरी तरुणांवर रानगव्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्यात एक शेतकरी जागीच ठार झाला, तर या दुर्घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले गारगोटी येथील कॅमेरामन - पत्रकार रघुनाथ शिंदे गव्याच्या हल्यात गंभीर जखमी होवून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत झाले.
आकुर्डे येथील तीन तरुण वैरण म्हणून उसाचा पाला काढण्यासाठी उसात गेले होते. गव्याच्या कळपातून चुकलेल्या भल्या मोठ्या गव्याने त्या तिघांपैकी अनिल पोवार या तरुणावर हल्ला केला. पोटात शिंगे घुसून रक्तस्त्राव झाल्याने पोवार हा जागीच ठार झाला. जीव वाचवून पळालेल्या दोघांनी ग्रामस्थाना या दुर्घटनेची माहिती दिली.
हे वृत्त कळताच तात्काळ "बी न्यूज़"चे रघुनाथ शिंदेही घटनास्थळी येऊन शूटिंग करत होते बांधावर उभा राहून गव्याचे शूटिंग करत असताना मागे फिरून गव्याने शिंदे यांना थेट धडक देऊन 10-12 फुटांवर उडवून भिरकावून दिले. शिंदे यांच्या पोटात एक शिंग घुसल्याने आतड़ी बाहेर आली आणि दुसरे शिंग मांडीत घुसले. गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांना गारगोटी येथे प्रथमोपचार करून तातडीने कोल्हापूरला हलविण्यात आले असता उपचार सुरू असताना मृत झाले.