उदयनराजेंच्या कॉलर उडवण्यावर केंद्रीय मंत्र्यांना खोचक प्रश्न; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 10:34 AM2023-09-28T10:34:32+5:302023-09-28T10:35:24+5:30
तुम्ही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू शकत नाही. त्यांनी राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर हे केलंय का? असा प्रतिसवाल केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकाराला केला.
सातारा – भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची कॉलर उडवण्याची स्टाईल बरीच चर्चेत आहे. अनेकदा उदयनराजे वादातही अडकले आहेत. नुकतेच केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्र्यांच्या बाजूला खासदार उदयनराजे बसले होते. त्यात एका पत्रकाराने केंद्रीय मंत्र्यांना उदयनराजेंच्या स्टाईलवरून खोचक प्रश्न विचारला.
केंद्रीय मंत्री भाजपा पक्षातील शिस्तीबाबत सांगत होते. त्यावेळी पत्रकाराने विचारले की, तुम्ही पक्षाच्या शिस्तीबाबत बोलला परंतु तुमच्या बाजूला बसलेले राज्यसभेचे खासदार हे उघडपणे कॉलर उडवतात, मुलींसोबत डान्स करतात हे सुरू आहे ती शिस्त आहे का? हे भाजपाचे चेहरे आहेत आणि ते असे करत असतील तर हे चांगले आहे का? असा खोचक प्रश्न विचारला. त्यावर शेजारी बसलेले उदयनराजे तीक्ष्ण नजरेने पत्रकाराकडे बघत होते.
त्यावर केंद्रीय मंत्री म्हणाले की, तुम्ही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू शकत नाही. त्यांनी राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर हे केलंय का? तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही पत्रकारिता करता, पण तुम्ही तुमच्या घरी काय करता हा आमचा विषय नाही. तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला गेला हा तुमचा विषय आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, नेते हे पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात शिस्तीचे पालन करतात. कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न विचारू शकत नाही असं उत्तर दिले. त्यावर पत्रकाराने कॉलर उडवणे, डान्स करणे ही भाजपाची शिस्त असेल तर ते आम्हाला मान्य नाही. तुमचे उत्तर आम्हाला मिळाले असं सांगत वाद घातला. दरम्यान, पक्षाचा कार्यक्रम हा सार्वजनिक असतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांचे वैयक्तिक आयुष्यही असते. पक्षाचे दहा लोक एकत्र भेटले हा त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम असतो असंही त्यांनी म्हटलं.