आधी शिवीगाळ अन् आता भररस्त्यात मारहाण; शिवसेना आमदारानं दिलेली धमकी खरी केली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 10:56 AM2023-08-10T10:56:54+5:302023-08-10T10:57:27+5:30

पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे

Journalist Sandeep Mahajan beaten up in Pachora Jalgoan, MLA Rohit Pawar criticized the state government | आधी शिवीगाळ अन् आता भररस्त्यात मारहाण; शिवसेना आमदारानं दिलेली धमकी खरी केली

आधी शिवीगाळ अन् आता भररस्त्यात मारहाण; शिवसेना आमदारानं दिलेली धमकी खरी केली

googlenewsNext

जळगाव – पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांची अलीकडेच पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यात आमदाराने पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी दिली होती. याबाबत कुठलीही कारवाई न झाल्याने आता दिलेल्या धमकीप्रमाणे पत्रकाराला भररस्त्यात मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलीय का असा प्रश्न विरोधक करत आहेत.

पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे. या घटनेवरून रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले की, पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची .का ? तर त्याने विरोधात बातमी छापली. विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल असं त्यांनी म्हटलं.

त्याचशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे, परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे अशी नाराजीही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, एका लोकप्रतिनिधीने पत्रकाराला शिवीगाळ करणे उचित नाही. परंतु जे काही आज घडले, त्यांना रस्त्यात मारहाण केली हे अशोभनीय आहे. गुंडगिरीचे वातावरण पाचोऱ्यात झाले आहे. याचा निषेध आहे. पाचोरा तालुक्याचा इतिहास राजकीय सुसंस्कृतीचा आहे. मागच्या गोष्टीचे अनुकरण आपण केले पाहिजे. राजकीय वारसा जपला पाहिजे. पाचोऱ्यात याआधीही अनेक नेत्यांवर टीका झालीय, घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. त्यामुळे सर्वांनी सुसंस्कृत वारसा जपणे गरजेचे आहे अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर केली आहे.

काय आहे प्रकरण?

जळगाव जिल्ह्यात सध्या एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणावरुन हादरला आहे. या प्रकरणावरुन एका स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आमदार किशोर पाटील यांना ही टीका पचनी न पडल्याने त्यांनी पत्रकाराला थेट शिवीगाळ केली. यासंदर्भात ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना ऑडिओ क्लीपबद्दल प्रश्न विचारला. त्यावर, त्यांनी होय ती ऑडिओ क्लीप  माझीच आहे, मीच पत्रकाराला शिवीगाळ केलीय, असा खुलासाही त्यांनी केला. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी जे केलं ते सांगायला मागे मागे हटणार नाही, असे म्हणत आपण पत्रकाराला का शिवीगाळ केली हे त्यांनी सांगितले.

Web Title: Journalist Sandeep Mahajan beaten up in Pachora Jalgoan, MLA Rohit Pawar criticized the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.