मृत्यूच्या दाढेतून वाहनचालकांचा प्रवास
By admin | Published: April 5, 2017 01:33 AM2017-04-05T01:33:29+5:302017-04-05T01:33:48+5:30
किवळे -विकासनगर भागातील ओढे व नाल्यावरील पुलांची रखडलेली व अद्याप सुरू न झालेल्या कामांमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
देहूरोड : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते कात्रज बाह्यवळण रस्त्यावरील देहूरोड ते किवळे -रावेत दरम्यानच्या सेवा रस्त्यांची झालेली दुरवस्था, सेवा रस्त्यांची विविध भागात अर्धवट कामे, किवळे -विकासनगर भागातील ओढे व नाल्यावरील पुलांची रखडलेली व अद्याप सुरू न झालेल्या कामांमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सेवा रस्त्यांवर काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे चित्र दिसून आले. महामार्गावर मार्गदर्शक, स्थलदर्शक फलक व सुरक्षेबाबत माहिती देणारे फलक लावलेले नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असून, धोकादायक व असुरक्षित बनलेल्या रस्त्यावरून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे देहूरोड येथील पोलिस ठाण्याच्या नजीकचा चौक ते सातारा ( कि़मी. ७२५ ते कि़मी. ८६५) दरम्यानचे एकूण एकशे चाळीस किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम एक आॅक्टोबर २०१० रोजी काम सुरू झाले असून, सदर काम पूर्ण करण्यासाठी ३० मार्च २०१३ पर्यंतची मुदत दिली होती. कामासाठी १७२४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. या कामांत मुख्य सहापदरी रस्त्याच्या कामांसह महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्ता बांधण्याचे नियोजन केले होते. संबंधित ठेकेदार विविध कारणे दाखवून कामाची मुदत वाढवत आहे.
देहूरोड -कात्रज महामार्गावर कॅन्टोनमेन्ट हद्दीत देहूरोड पोलीस ठाणे ते शितळानगर हद्दीत महामार्ग रुंदीकिरण करताना काढलेले पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत. (वार्ताहर)
>ठेकेदारांचा करार
रद्द होणार का ?
गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात पुणे व सातारा भागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे महामार्गाची विविध कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबद्दल आणि कामाबाबत अनेक तक्रारी संबंधित रस्त्याच्या कामाबाबत आयोजित आढावा बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी गडकरी यांनी ठेकेदाराला अंतिम मुदत देत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. पण हा करार रद्द होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
देहूरोड येथील पोलिस ठाण्या नजीकच्या सेंट्रल चौकापासून किवळे उड्डाण पुलापर्यंत देहूरोड कॅन्टोन्मेंट व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील किवळे व विकासनगर भागात महामार्गाच्या दुतर्फा सर्वत्र जागा उपलब्ध असताना अद्यापही सेवा रस्त्याची कामे अर्धवट स्थितीत आहेत. काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू करण्यात आली असून, पुन्हा बंद करण्यात आलेली दिसत आहेत. तर काही ठिकाणच्या कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही. प्रामुख्याने जागा ताब्यात असतानाही देहूरोड ते शितळानगर पुलापर्यंत तसेच इंद्रप्रभा संकुल (विकासनगर) ते किवळे पुलापर्यंत सेवा रस्त्याचे काम गेल्या सात वर्षांत सुरूच झालेले नाही. शितळानगर ते विकासनगर पेट्रोल पंपापर्यंत सेवा रस्त्याचे काम विविध ठिकाणी अर्धवट सोडलेले दिसत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
किवळे ते रावेत पवना नदीपर्यंत सेवा रस्त्याची विविध ठिकाणी दुरवस्था झालेली आहे. विकासनगर येथील शिंदे पेट्रोल पंप ते किवळेतील महापालिका जकात नाका भागातील सेवा रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे विजेचे खांब काढलेले नाहीत. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शितळानगर येथील जकात नाका ते देहूरोड सेंट्रल चौकादरम्यान सेवा रस्त्याच्या कामासाठी सुरुवात केल्यानंतर संरक्षक बाजूपट्ट्या दीड ते दोन फूट खोल खोदण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्या भागात सेवा रस्त्याचे काम रखडले असून, खोदलेल्या भागात वाहने उलटून अपघात होऊ लागले आहेत. किवळे -रावेत भागात सेवा रस्त्यावर गॅरेज तसेच फर्निचर व्यावसायिकांनी सेवा रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याचे दिसत आहे. किवळेजवळ मुख्य महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत.
>रावेत भागात गटारीचे काम अर्धवट
रावेत येथील भुयारी पुलाजवळ ठेकेदाराने खोदलेले चर तसेच असून, काही गटारींची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे परिसरात जमा होणारे सांडपाणी सेवा रस्त्यावर येत असून, त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने सांडपाणी मुख्य सेवा रस्त्यावर येते. भुयारी मार्गाच्या पुलाजवळ लहान मोठे खड्डे पडले आहेत. भुयारी मार्गाजवळ सेवा रस्त्यावर दोन ठिकाणी गतिरोधक बनविण्यात आलेले असून, त्यावर पांढरे पट्टे नसल्याने वाहने आदळत असल्याचे दिसून आले.
>पुलाची कामे अर्धवट, सुरुवातही नाही
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जकात नाक्याजवळ मामुर्डी (शितळानगर) येथील पुलाचे काम सुरूझाल्यानंतर पुन्हा रखडले असल्याचे दिसत असून, त्याठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका दिसत आहे. विकासनगर-किवळे येथील महामार्गाच्या सेवा रस्त्यावर उच्चदाब वीज वाहिन्या व रोहित्र हलविण्यासाठी अद्याप सुरुवात झालेली नसल्याने, रुंदीकरण संबंधित भागात कामे सुरू करण्यात आलेली दिसत नाहीत.
मार्गदर्शक, स्थलदर्शक फलकांचा अभाव
मुख्य महामार्गावर रावेत, किवळे, विकासनगर, उत्तमनगर, मामुर्डी, शितळानगर आदी ठिकाणी गावांच्या नावाचे फलक लावलेले नाहीत. या भागात विविध ठिकाणी मदत, रुग्णवाहिका, दवाखाना दर्शविणारे मार्गदर्शक फलक लावलेले नाहीत. मुंबई, पुणे, सातारा आदी शहरांचे अंतर दर्शविणारे फलक बसविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनचालकांना रात्रीच्या वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. देहूरोड ते रावेत भागात दुभाजकातील झाडे गायब झाल्याचे चित्र दिसून आले आहे.