चाकरमान्यांचा गणेशोत्सवात कोकणचा प्रवास सुकर
By admin | Published: August 25, 2016 05:52 AM2016-08-25T05:52:58+5:302016-08-25T05:52:58+5:30
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम व कोकण रेल्वेकडून विशेष फेऱ्या सोडल्या जातात.
मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम व कोकण रेल्वेकडून विशेष फेऱ्या सोडल्या जातात. यंदा कोकणात आणि त्यामार्गे जाणाऱ्या २२६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. गणेशोत्सवात कोकणात जाताना मेल-एक्स्प्रेस गाड्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. तिकीट न मिळाल्याने अनेक प्रवासी उभ्याने प्रवास करतात. काहींना तर दोन डब्यांतील जागेमध्ये किंवा बाथरूमजवळही उभे राहावे लागते. प्रवाशांची वाढती मागणी पाहता आणि गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नेहमीच विशेष फेऱ्यांचे नियोजन केले जाते. यंदा २२६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, या सर्व ट्रेन चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी, करमाळी, मडगावसाठी सोडण्यात येतील. एकूण फेऱ्यांपैकी २४ फेऱ्या या वांद्रे टर्मिनस आणि १४ फेऱ्या अहमदाबादसाठी व्हाया वसईमार्गे असल्याचे सांगण्यात आले.
काही ट्रेन या फक्त गणेशोत्सवासाठीच असल्याने त्या ट्रेनला नव्याने क्रमांक देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, ट्रेनची माहिती प्रवाशांना वेळोवेळी मिळावी, यासाठी स्थानकांवर उद्घोषणा करण्यात येणार आहे.
तसेच पाण्याची व्यवस्था, रेल्वे पोलीस आणि काही स्थानकांवर रेल्वे कर्मचारीही मोठ्या प्रमाणात असतील, असे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)