ज्वारी उत्पादनात २० टक्के वाढ

By admin | Published: November 6, 2015 01:25 AM2015-11-06T01:25:27+5:302015-11-06T01:25:27+5:30

यंदा उशिरा झालेल्या पावसाचा फायदा ज्वारीला होणार असल्याने २० टक्के उत्पादन वाढीचा दावा राहुरी कृषी विद्यापीठाने केला आहे. देशात ४५ तर महाराष्ट्रात ३२ लाख हेक्टरवर ज्वारीची

Jowar production increased by 20 percent | ज्वारी उत्पादनात २० टक्के वाढ

ज्वारी उत्पादनात २० टक्के वाढ

Next

- भाऊसाहेब येवले,  राहुरी(अहमदनगर)
यंदा उशिरा झालेल्या पावसाचा फायदा ज्वारीला होणार असल्याने २० टक्के उत्पादन वाढीचा दावा राहुरी कृषी विद्यापीठाने केला आहे. देशात ४५ तर महाराष्ट्रात ३२ लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे.
सध्या पेरणी झालेली रब्बी ज्वारी गर्भावस्थेत असून महाराष्ट्रात ३२ लाख हेक्टर क्षेत्रावर समाधानकारक परिस्थिती आहे़ स्वाती नक्षत्र ७ नोव्हेंबर रोजी संपत असून, या दरम्यान पाऊस झाला, तर ज्वारी उत्पादनात भरघोस वाढ होईल, परंतु पाऊस झाला नाही, तरी २० टक्के वाढ अपेक्षित आहे.
अहमदनगर, पुणे, सोलापूर या तीन जिल्ह्यात तब्बल १६ लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारी उभी असून, उत्पादन वाढण्याची चिन्हे असल्याचे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ ज्वारी पैदासकार शरद गडाख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ भारी जमिनीवर २९ टक्के, मध्यम जमिनीवर ४८ टक्के, तर हलक्या जमिनीवर २३ टक्के रब्बी ज्वारीचे पीक उभे असल्याची माहिती गडाख यांनी दिली़
यंदा ज्वारी पेरणीपूर्वी पाऊस पडला नव्हता़ ९ सप्टेंबरपासून पाऊस सुरू झाला़ मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात पावसाने हजेरी लावली होती़ यंदा वरच्या थरात पाऊस उपयुक्त ठरला. यंदा केवळ २६२ मिलीमीटर पाऊस नगर जिल्ह्यात पडला़ मागील वर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते़ यावर्षी १४ दिवस पावसाने हजेरी लावली़ हा पाऊस ५० टक्के असला, तरी ज्वारीचे चित्र समाधानकारक आहे़ यंदा मात्र हुमणीच्या किडीचा प्रादुर्भाव ज्वारी पिकावर आढळून आला़ या किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोफायरीफास हे औषध १० लीटरला २५ मिली याप्रमाणे फवारावे, त्यामुळे दोन दिवसांत कीड आटोक्यात येईल, असे गडाख यांनी सांगितले.

अशी घ्या काळजी़़़
ज्वारीला तीन, पाच व आठ आठवड्यांच्या अंतराने कोळपण्या द्याव्यात़ अन्यथा जमिनीला दीड मीटर भेगा पडतात़ विरळणी करताना केवळ एकच कोंब ठेवावा़ हेक्टरी १ लाख ४८ हजार कोंब संख्या अपेक्षित आहे़ विरळणीमुळे ज्वारीच्या उत्पादनात २० टक्के वाढ होते़ खोडमाशीमुळे फुटवे फुटले असतील, तर त्यातून एक फुटवा ठेवावा़

ज्वारी उत्पादक शेतकरी आत्माराम वाघ, ज्ञानदेव कुऱ्हे, लहू मडके, उत्तमराव आहेर, शिवाजी काकडे, शशिकांत पवार, भाऊसाहेब खैरे, बाळासाहे खरात यांनी रब्बी ज्वारी यंदा उत्पादन वाढविण्यास हातभार लावील, असा विश्वास व्यक्त केला़ शेतकऱ्यांनी ज्वारीची वेळेवर विरळणी केली आहे़ याशिवाय कोळपणी करण्यात आली आहे़

Web Title: Jowar production increased by 20 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.