रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच माझा आॅक्सिजन
By admin | Published: May 28, 2017 01:08 AM2017-05-28T01:08:23+5:302017-05-28T01:08:23+5:30
तात्याराव लहाने : कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘अत्याधुनिक उपचार पद्धतीअभावी, तसेच पाहू न शकणाऱ्या गोरगरीब रुग्णांवर जेव्हा मी शस्त्रक्रिया करतो आणि एक-दोन दिवसांनी जेव्हा दिसायला लागल्याचे पाहून त्या रुग्णांच्या चेहऱ्यावरील जो आनंद दिसतो, तोच माझा आॅक्सिजन आहे,’ असे प्रतिपादन मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलचे डीन आणि लाखो रुग्णांचा दृष्टिदाता डॉ. तात्याराव लहाने यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केले.
कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात डॉ. लहाने बोलत होते. त्यांनी यावेळी अनेक अनुभव, आठवणी सांगितल्या. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्यावरील शस्त्रक्रियेबाबतच्या आठवणींना उजाळा दिला.
बाबा आमटे यांच्या कार्याची प्रेरणा आणि आईच्या किडनीमुळे मिळालेले आयुष्य यामुळे मला सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. गोरगरीब रुग्ण हाच आपल्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अत्याधुनिक उपचारांअभावी अनेकजण पाहू शकत नाहीत, असे गरजू रुग्ण माझ्याकडे येतात. मी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करतो. जेव्हा दिसायला लागल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहायला मिळतो, तो क्षण माझ्या दृष्टीनेही आनंददायी असतो. हाच आनंद हाच माझा आॅक्सिजन आहे. मी आता जे. जे. रुग्णालयाचा अधिष्ठाता असलो तरीही माझी रुग्णसेवा सुरूच आहे. अधिष्ठातामध्ये अडकलो असतो तर मी कारकून झालो असतो. म्हणून सकाळी सात वाजल्यांपासून दुपारी एकपर्यंत डॉक्टर म्हणून शस्त्रक्रिया करतो आणि दुपारी दोननंतर मी अधिष्ठाता असतो, असे लहाने म्हणाले.
शासकीय रुग्णालयातील प्रत्येक अधिष्ठाताने वैद्यकीय व्यवसाय केलाच पाहिजे. त्यांनी केवळ व्यवस्थापनात व्यस्त राहून आपल्यातील डॉक्टरला मारता कामा नये. यासंदर्भात मी राज्य सरकारच्या यंत्रणेलाही तशी सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी रुग्णालयाच्या माध्यमातून नेत्रोपचाराच्या अत्याधुनिक सुविधा खेडेगावातून पोहोचल्या पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. त्यासाठी आम्ही राज्याच्या सर्वच जिल्ह्णांत जाऊन रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या असल्याचे लहाने यांनी सांगितले.
समाजसेवा करणे कठीण काम नाही. चांगले काम करताना काही वेळेला अडचणी या येतात; पण ते गृहित धरून काम करायचे असते. मलाही माझ्या जीवनात असे अनेक अडथळे निर्माण झाले.
मध्यंतरी एका प्रकरणात बराच त्रास झाला. तेव्हा मी नोकरी सोडण्याची तयारी केली होती; परंतु मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीमुळे तो विचार सोडून दिला, असेही लहाने यांनी सांगितले. प्रारंभी अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी स्वागत केले, तर उपाध्यक्ष तानाजी पोवार यांनी आभार मानले.
अवयवदान चळवळ व्यापक व्हावी
राज्यात अवयवदान चळवळ व्यापक झाली पाहिजे, त्याकरिता जनजागृती होणे फार महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा डॉ. लहाने यांनी व्यक्त केली. नेत्रदानाबाबत गैरसमज जास्त आहेत. यापुढेही ते तसेच सुरू राहिले, तर अंध हे अंधच राहतील. विज्ञान माहीत असूनही अपेक्षेइतके नेत्रदान मिळत नाही. किडनीदानाच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे, असेही ते म्हणाले.
देशात २२ लाख रुग्णांना नेत्रांची गरज
महाराष्ट्रात दोन लाख रुग्णांना नेत्रांची गरज
२५ हजार लहान मुलांना नेत्रांची गरज