जुबेर जेरबंद
By admin | Published: August 8, 2015 02:11 AM2015-08-08T02:11:10+5:302015-08-08T02:11:10+5:30
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचा भारतातील प्रवक्ता बनण्याची इच्छा व्यक्त केलेल्या झुबेर अहमद खान या कथित पत्रकाराला
नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचा भारतातील प्रवक्ता बनण्याची इच्छा व्यक्त केलेल्या झुबेर अहमद खान या कथित पत्रकाराला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त मोहिमेत गुरुवारी रात्री उशिरा येथे अटक केली. तो नवी मुंबईतील असून, त्याने फेसबुकवरील पोस्टवर याकूब मेमनला शहीद ठरवितानाच इसिससाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
त्याच्या पोस्टला लाइक करणाऱ्यांची चौकशी आणि त्याची प्रस्तावित
योजना विचारात घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत त्याचा मोबाइल नंबर मिळविला होता. त्याच्या मोबाइल क्रमांकाच्या साह्याने त्याचा ठावठिकाणा दिल्लीतील वसंतविहार कॉलनीत आढळून आला. त्याच्याविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तेथे नेऊन चौकशी केली जाणार असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भादंविच्या विविध कलमांन्वये तसेच देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हाही त्याच्याविरुद्ध दाखल केला जाऊ शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मला मुस्लिमांचा आवाज बनून समाजासमोर मुस्लिमांचे खरे चित्र मांडायचे आहे. धर्माच्या आधारावर मदत करणाऱ्यांचा इसिसकडून विश्वासघात केला जात नाही, असेही त्याने नमूद केले होते. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची शक्यता मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जुबेर खान याने राज्यशास्त्रातून एमए केले आहे. त्याच बरोबर त्याने बॅचलर आॅफ जर्नालिझम मणिपाल युनिव्हर्सिटीतून केले आहे.
झुबेर खान हा ऊर्दू वृत्तपत्रात काम करीत असल्याचे आणि आंतरराष्ट्रीय शांततेसाठी काही साप्ताहिक चालवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. इसिसचा प्रवक्ता बनण्यासाठी जात असल्याचे सांगून त्याने नवी मुंबई सोडली होती. तो दिल्लीतील इराकी दूतावासाच्या अधिकाऱ्यांना भेटून पासपोर्ट सादर करणार होता.
न्यायालयात जाणार
जुबेरचे अकाउंट कोणीतरी हॅक केले असावे. त्याचे व आमच्या कुटुंबीयांचे कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नाहीत. जुबेरच्या अटकेविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. आम्हाला नक्की न्याय मिळेल.
-फक्रद्दीन खान, जुबेरचा छोटा भाऊ
याकूबला म्हटले होते शहीद
मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील दोषी आरोपी याकूब मेमन याला ३० जुलै रोजी नागपुरात फाशी देण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झुबेर खान याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना याकूबला शहीद संबोधून खळबळ उडवली होती. याकूबच्या फाशीचा बदला घेण्यासाठी इसिसमध्ये दाखल होण्याची त्याने इच्छा व्यक्त करताच काहींनी त्याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती.