शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा लढत अटळ
By Admin | Published: May 8, 2017 04:12 AM2017-05-08T04:12:49+5:302017-05-08T04:12:49+5:30
कर्जमुक्तीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याबाबत सांगितले. आम्ही दिल्लीला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कर्जमुक्तीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याबाबत सांगितले. आम्ही दिल्लीला गेलो, पण दिल्लीश्वरांनी हात वर केले. विधानसभेतील शब्द हा वचनाप्रमाणे असतो. एक महिना झाला; परंतु अजून काहीही झालेले नसल्याचे सांगत, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाहीतर लढत निश्चित आहे, असा अल्टीमेटम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.
मराठवाड्यातील ४६ विधानसभा मतदारसंघांत आमदार, नगरसेवकांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून तयार केलेला ग्राऊंड रिपोर्ट पक्षप्रमुख ठाकरे यांना सादर केला. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, सरकारचा पाठिंबा काढण्याबाबत हा दौरा नाही. कर्जमाफीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. पेरणीचा हंगाम आता सुरू होण्यात आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर पुन्हा वाढणार आहे. पहिले कर्ज तसेच राहणार आहे. मुख्यमंत्री म्हणतात मागेल त्याला कर्ज देऊ. परंतु पहिल्या कर्जातून त्यांना मुक्त करणे गरजेचे आहे. जिल्हा बँका मोडीत काढल्या आहेत. राष्ट्रीय बँका गावागावांत गेल्या असल्या तरी त्यांचे शेतकऱ्यांशी नाते नसल्याचा आरोप त्यांनी केला.
सत्तेतून बाहेर पडणार नाही
हे अभियान निवडणुकीचा स्टंट नाही. माझ्या मार्गाने कर्जमुक्तीसाठी पुढे जाणार आहे. तीन वर्षांपासून वाटच पाहत आहोत. यापुढे मला जे वाटते ते करणार, माझ्या पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय मिळून देणार. मी सत्तेला चिकटून राहिलेलो नाही. बऱ्याच वर्षांनंतर राज्यात सत्तांतर झाले. सरकारकडून अपेक्षा असणे चूक नाही. पूर्वीच्या सरकारसारखे अनुभव जनतेला येऊ नयेत. सत्तेत असताना विरोध करून जनतेसोबत राहण्याचा हा प्रयत्न आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
तूर खरेदीबाबत नियोजन चुकले
शेती उत्पादनाचे नियोजन करणाऱ्यांमध्ये शेतकरीच नाहीत. तूर खरेदीमध्ये शासनाचे नियोजन चुकले आहे. शेतकरी तूर ठेवणार कुठे, असा प्रश्न असून खरेदीच्या अटी, शर्ती कमी करून तूर खरेदी केली जावी.
राष्ट्रपतिपदासाठी भागवतच योग्य
देशाला हिंदुत्वादी राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर देशाला कणखर राष्ट्रपती पाहिजे. देशात आरआरएसचे कार्यकर्ते अनेक राज्यांत राज्यपाल झालेले आहेत. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव योग्यच वाटते, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. माजी कृषिमंत्री शरद पवार राष्ट्रपती होऊ शकतात, असे खा. संजय राऊत म्हणाले होते. याचे स्पष्टीकरण देताना ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांनी त्यांना गुरू मानले आहे. खा.राऊत यांचा तो शाब्दिक वाद होता.