न्यायाधीशांनी केली घटनास्थळाची पाहणी
By admin | Published: July 29, 2016 04:35 PM2016-07-29T16:35:35+5:302016-07-29T16:35:35+5:30
येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात सरकारी पक्षाच्या मागणीवरून न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी केली.
ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. २९ - येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात सरकारी पक्षाच्या मागणीवरून न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी रूपेशकरिता आरोपीने घेतलेल्या चिप्सच्या दुकानापासून ते त्याची हत्या केली ते ठिकाण आणि त्याचा मृतदेह आणून टाकला त्या ठिकाणाचे अवलोकन केले.
वर्धा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात गाजत असलेले रूपेश मुळे प्रकरण साक्ष संपल्याने आता युक्तीवादावर आहे. यातच सदर प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी घेतलेल्या आकक्षेपावरू सरकारी पक्षाच्या मागणीवरून खुद्द न्यायालयाने घटनास्थळाची पाहणी केली. न्यायालयाने घटनास्थळाची पाहणी करीत तपास अधिकारी, सरकारी व आरोपीच्या वकीलांकडून माहिती जाणून घेतली.
हे अवलोकन पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रानुसारच करण्यात आले. यात रूपेशच्या अपहरणापासून आरोपीने त्याला ज्या मार्गाने फिरविल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले त्याच मार्गाने शुक्रवारी अवलोकन करण्यात आले. आरोपीने रूपेशचे अपहरण करण्यापूर्वी प्रथम ज्या दुकानातून चिप्सचे पॅकेट घेतले त्या दुकानापासून या पाहणीला प्रारंभ झाला. न्यायाधीशांसह उपस्थितांचा ताफा रूपेशच्या घरापर्यंत पोहोचला.
पोलिसांनी म्हटल्याप्रमाणे ज्या ठिकाणाहून आरोपी आसिफ शहा उर्फ मुन्ना पठाण याने रूपेशला आॅटोत बसविले त्या ठिकाणाची पाहणी त्यांनी केली. येथून सदर ताफा मुन्ना पठाण याने रूपेशची हत्या केली त्या ठिकाणी पोहोचला. नागगपूर-यवतमाळ बायपासवर असलेल्या या ठिकाणाची पाहणी करून न्यायाधीश चांदेकर व त्यांचा ताफा रूपेशचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तिथे पोहोचला.
येथे ज्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांत आरोपीने रूपेशचा मृतदेह टाकला त्या ठिकाणाची पाहणी केली. येथून त्यांनी आरोपी ज्या मार्गे परत गेला त्या मार्गाची माहिती घेत आर्वी नाका मार्गे हे पथक न्यायालयात रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत सरकारी वकील अनुराधा सबाने, अॅड. श्याम दुबे, आरोपीचे वकील शहा, अॅड. परमानंद टावरी, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मुरलीधर बेलखोडे व रूपेशचे वडील उपस्थित होते.
आरोपीने जंगल सोडून शहरात मृतदेह का फेकला ?
पोलिसांच्या तपासानुसार आरोपीने रूपेशची हत्या नागपूर-यवतमाळ मार्गावर असलेल्या आलोडीनजीकच सुनसान ठिकाणी केली. मग त्याने त्याचा मृतदेह त्याच भागात न टाकता ज्या भागात वर्दळ आहे, अशा ठिकाणी का आणला असा सवाल आरोपीचे वकील शहा यांनी केला आहे, यावर पोलीस काय उत्तर देतात, हे येत्या सुनावणीत कळणार आहे.
यासह सरकारी पक्षाकडे रूपेशचा रक्त अहवाल नाही, शवविच्छेदन अहवालाची खरी प्रत नाही, रासायनिक विशेषज्ज्ञांचा खरा अहवाल नाही, अखेरचा साक्षदार कोण या बाबत पोलिसांत सुसुत्रता नसल्याचे आरोपीच्या वकीलाने सांगितले आहे. यामुळे या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा संशय वर्तवित प्रकरणाची पुन्हा नव्याने तपासणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.