न्यायाधीश, वकिलांनी लावला डोक्याला हात; ज्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या सुनावणीला अर्जदार ‘अशा ’अवस्थेत बसला..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 03:27 PM2020-04-25T15:27:02+5:302020-04-25T15:27:30+5:30
अचानक ते 'त्या' अवस्थेत कॅमेरा समोर आल्याने मोठा गोधळ उडाला...
पुणे : कोरोनाच्या भीतीने न्यायालयाने महत्वाच्या सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र यावरून अनेकदा गंमतीदार प्रसंग घडताना दिसत आहेत. जयपूर येथील एका न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू असताना अर्जदार हा चक्क ‘त्या’अवस्थेत सामोरा गेला असल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा अर्जदार वकिलच असल्याने न्यायाधीश आणि सरकारी वकील यांनी डोक्याला हात लावला.
वाढता कोरोनाचा संसर्ग यामुळे न्यायालय प्रशासनाकडून काळजी घेण्यात आली आहे.न्यायालयाच्या आवारात गर्दी न करणे, केवळ महत्त्वाचे प्रकरण हाताळणे, आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपीना सुनावणी च्या वेळी न्यायालयात न आणता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रकरण सुरू ठेवणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अशीच एक सुनावणी जयपूरच्या संजीव प्रकाश शर्मा यांच्या न्यायालयात सुरू होती. त्यावेळी रवींद्र कुमार पालिवाल यांच्या प्रकरणाची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे सुरू होती. त्यावेळी ते अचानक बनियन मध्ये कॅमेरा समोर आल्याने मोठा गोधळ उडाला.
यावर न्यायालयाने वकिलांनी यापूर्वी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून व्हिडीओ कॉन्फरन्सला सामोरे जावे. तसेच आपला गणवेश परिधान करून कॅमेरा समोर यावे. असे सांगून त्या सुनावणीला पुढील तारीख दिली.
* सध्याची परिस्थिती अशी आहे की यावेळी कुठलिही गोष्ट सहजपणे उपलब्ध होत नाही. संबंधित वकिलाला काही तांत्रिक अडचण असावी मात्र अचानक झालेल्या घाई गडबडीत त्याच्याकडून ती चूक झाली. न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. ज्या विशिष्ट शिस्तीत न्यायालयाचे कामकाज चालते त्याचा भंग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कोरोणामुळे सर्वजण घरात बसून आहेत. आॅफिस बंद आहे. बाहेर पडायला परवानगी नाही. वाहतूक बंद अशावेळी सूट, टाय, कोट, या जर कार्यालयात विसरले असेल तर ऐनवेळी समस्येला सामोरे जावे लागत आहे.
- अॅड. दीपक शामगिरे
* कुठल्याही परिस्थितीत न्यायालयाचा अवमान होता कामा नये. त्या वकिलाने किमान शर्ट परिधान करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. काही तांत्रिक अडचण असेल न्यायालयाच्या सूचना पाळल्या जाव्यात. घरातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करताना घरात कोट नसणे हे जरी मान्य केले तरी पांढरा शर्ट अशावेळी वापरणे महत्वाचे आहे. न्यायाधीश त्यांचा कर्मचारी वर्ग हा आपल्याला पाहत असतो. तेव्हा या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल योग्यच आहे.
- अॅड. मिलिंद पवार (माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन