झाडांच्या कत्तलीप्रकरणी न्यायाधीश घालणार लक्ष
By Admin | Published: June 6, 2017 05:57 AM2017-06-06T05:57:01+5:302017-06-06T05:57:01+5:30
उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीमध्ये दोन ज्येष्ठ विद्यमान न्यायाधीशांचा समावेश आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पासाठी झाडांच्या कत्तलीसंदर्भातील तक्रारींबाबत उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीमध्ये दोन ज्येष्ठ विद्यमान न्यायाधीशांचा समावेश आहे. झाडे लावण्याबाबत दिलेले आश्वासन एमएमआरसीएल पाळत आहे की नाही, यावरही ही समिती लक्ष ठेवणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लि. (एमएमआरसीएल) ला जी झाडे तोडण्याची परवानगी नाही, ती झाडे तोडण्यासह जी झाडे अन्य ठिकाणी लावली जाऊ शकतात, त्यांचीही एमएमआरसीएल कत्तल करत आहे. त्यास स्थगिती द्यावी, असा विनंती अर्ज कुणाल बिरवाडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केला. मात्र उच्च न्यायालयाने अर्जावर सुनावणीस नकार दिला.
‘न्या. शंतनू केमकर व न्या.भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमली आहे. झाडांच्या कत्तलीवरील स्थगिती हटविण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे. ज्याला झाडांच्या कत्तलीबाबत तक्रार करायची आहे, त्याने समितीपुढे तक्रार मांडावी, असे म्हणत उच्च न्यायालयाने सुनावणीस नकार दिला.