न्यायाधीशांनी जिंकली न्यायालयीन लढाई
By admin | Published: October 4, 2015 02:59 AM2015-10-04T02:59:49+5:302015-10-04T02:59:49+5:30
ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षपदावर फेरनियुक्ती मिळावी, यासाठीची न्यायालयीन लढाई दोन न्यायाधीशांनी जिंकली आहे. अकोला येथील रामलाल भवरलाल सोमानी
- विलास गावंडे, यवतमाळ
ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षपदावर फेरनियुक्ती मिळावी, यासाठीची न्यायालयीन लढाई दोन न्यायाधीशांनी जिंकली आहे. अकोला येथील रामलाल भवरलाल सोमानी आणि पुणे येथील शरद दिगंबर मडके यांना जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष म्हणून फेरनियुक्ती देऊन रुजू होण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
रामलाल सोमानी व शरद मडके यांची जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली होती. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना फेरनियुक्ती नाकारण्यात आली. अशी नियुक्ती केवळ ग्राहक मंच सदस्यांनाच देता येते, अध्यक्षांना नाही, अशी बाजू मांडून राज्य आयोगाने त्यांच्या नावाची शिफारस केली नव्हती. या विरोधात दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुनर्नियुक्ती अध्यक्ष आणि सदस्यांनाही लागू होत असल्याचे सांगत न्यायालयाने सोमानी आणि मडके यांच्या बाजूने निर्णय दिला.या निर्णयाच्या आधारे सोमानी यांना नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष म्हणून तर, मडके यांना कोल्हापूर जिल्हा मंचचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळाली आहे. आयोगाने हा आदेश जारी केला आहे.
दोन अध्यक्षांकडे नवीन जिल्हे
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दोन अध्यक्षांकडे नवीन जिल्हे दिले आहेत. नागपूर जिल्हा मंचचे अध्यक्ष एम.जी. चिलबुले यांच्याकडे यवतमाळ जिल्हा मंचची जबाबदारी दिली आहे. कोल्हापूर जिल्हा मंचचे अध्यक्ष एस.पी. बोरवाल यांची नियुक्ती बीड जिल्हा मंचचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.