राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी
By Admin | Published: July 5, 2015 04:24 PM2015-07-05T16:24:46+5:302015-07-05T18:30:29+5:30
मोहोळमधील राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ५ - मोहोळमधील राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून न्यायालयाने पोलीस स्टेशनवर दगडफेक करणा-या ५७ समर्थकांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. कदम यांच्या समर्थकांनी शनिवारी मोहोळ पोलिस स्थानकावर हल्ला केला होता.
सोलापूर- पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यावर मोहोळ येथील पुलाखालील मोकळ्या जागेत अतिक्रमण होऊ नये यासाठीी संरक्षक जाळी बसवण्यात आली होती. मात्र आ. कदम यांच्या सांगण्यावरून ही जाळी परस्पर काढण्यात आल्याने मोहोळ पोलिसांनी कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आपल्यावरील गुन्ह्यांप्रकरणी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी कदम निघाले, मात्र जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या सांगण्यावरून आपल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर कदम यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र समर्थक बधले नाहीत. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, त्यामुळे अधिक खवळलेल्या समर्खांनी पोलिस स्टेशनवरच दगडफेक केली. त्यात ४ अधिका-यांसह एकूण १८ पोलिस जखमी झाले.
सरकारी कामात अडथळा आणल्याचा व पोलिस कर्मचा-यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी कदम यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला. त्यांना आज मोहोळ न्यायालयापुढे हजर केले असता न्यायलयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली असून त्यांना कळंबा तुरूंगात ठेवण्यात येणार आहे.