भीमा-कोरेगाव घटनेची न्यायालयीन चौकशी होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 01:57 PM2018-01-02T13:57:40+5:302018-01-02T14:32:41+5:30
या घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचबरोबर, सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून या घटनेतील मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई : नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गटात वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारी, गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकीत झाले. यात एका युवकाचा मृत्यू झाला असून ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचबरोबर, सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून या घटनेतील मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक लढाईला 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त याठिकाणी राज्यभरातून साडे-तीन लाख लोक आले होते. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, दोन समाजात तेढ निर्माण करुन हिंसाचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करुन शांतता राखावी असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच, या घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी होणार आहे. या घटनेत ज्या युवकाचा मृत्यू झाला. त्याची हत्या समजून सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. याचबरोबर, मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यभरात ज्याठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या, त्याठिकाणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच, अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवणाऱ्यांवर कारवाई करु, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भीमा-कोरेगाव घटनेला कोणताच रंग देऊ नये - शरद पवार
भीमा-कोरेगाव प्रकरणावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना शांतता बाळगण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले. जे घडलं त्याची चौकशी राज्य सरकारने करावी. जे सार्वजनिक क्षेत्रात काम करतात त्यांनी हे पसरु न देण्याची भूमिका घ्यावी. घडलेला प्रकार शोभादायक नाही. यावर पूर्णविराम कसा पडेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनी यात तेल न टाकता कोणतेही भाष्य करु नये, किंवा चर्चा करु नये. जे काही करायचे असेल ते सामंज्यस्याने करावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.