नोकरीसाठीची उडी पडली महागात
By admin | Published: September 4, 2016 01:44 AM2016-09-04T01:44:54+5:302016-09-04T01:44:54+5:30
अग्निशमन दलात भरती होण्याची उमेद घेऊन आलेल्या अनेक उमेदवारांच्या मात्र पदरी आज निराशाच पडली. बोरीवली येथे सुरू असलेल्या शारीरिक चाचणीदरम्यान दलाच्या ढिसाळ नियोजनामुळे
मुंबई : अग्निशमन दलात भरती होण्याची उमेद घेऊन आलेल्या अनेक उमेदवारांच्या मात्र पदरी आज निराशाच पडली. बोरीवली येथे सुरू असलेल्या शारीरिक चाचणीदरम्यान दलाच्या ढिसाळ नियोजनामुळे सुमारे १५० ते २०० उमेदवार जखमी झाले असून, काहींना जबर मार बसल्यामुळे ते कायमचे ‘अनफिट’ झाले आहेत. त्यामुळे रोजगारासाठी आलेल्या उमेदवारांचे भविष्य अंधारात गेले आहे.
मुंबईत अग्निशमन दलात ७७५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी १४ हजार उमेदवार रिंगणात उतरले होते. अग्निशमन दलाच्या बोरीवली विभागात भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी पार पडली. भरती प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना ८०० मीटर धावणे आणि २० फुटांवरून उडी मारणे बंधनकारक आहे. त्यात निवड होणारे पुढील चाचणीसाठी पात्र ठरणार होते. भरतीत मुंबईसह ग्रामीण भागातील तरुण-तरुणींचा मोठा सहभाग होता. भरती प्रक्रियेतील उंचावरून उडी मारताना, अनेकांची नोकरीची स्वप्ने भंगली. २० फूट उंचीवरून खाली उडी मारणाऱ्या उमेदवारांना एका ताडपत्रीद्वारे झेलले जाते. ताडपत्री पकडण्यासाठी २० ते २५ जणांचा घोळका असतो. मात्र ताडपत्री हलल्यामुळे १५० ते २०० तरुण जखमी झाले. त्यातील काहींना झालेल्या गंभीर दुखापतींमुळे ते पुन्हा फिट होऊ शकणार नाहीत. (प्रतिनिधी)
अधिकारीही जखमी : उडी मारण्याच्या फेरीदरम्यान एक उमेदवार ताडपत्री हातात असलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यावर कोसळला. या वेळी त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन दिवस ते बेशुद्ध होते. ते बोरीवली अग्निशमन केंद्र येथे कार्यरत आहेत.
अग्निशमन दलात भीतीला जागा नाही. आग लागल्यास अनेकदा उंचावर उभे राहून आग विझविण्याचे आव्हान जवानांसमोर असते. अशावेळी तो घाबरून खाली कोसळला, त्यात त्याचा मत्यू झाला. तर याला जबाबदार कोण, त्यामुळे उंचावरून उडी मारणे हे अग्निशमन दलासाठी महत्त्वाचे आहे. जे जखमी झाले ते त्यांच्या चुकीमुळे तसेच भीतीमुळे झाले.
- प्रभात रहांगदळे,
अग्निशमन दलाचे प्रमुख
मी चुलत भाऊ चेतनसोबत या भरती प्रक्रियेत उडी घेतली. दोघांच्याही पायांना जबर मार बसला आहे. त्यामुळे किमान दोन ते तीन आठवडे आम्हाला बेडरेस्ट सांगण्यात आली आहे. मात्र ७ सप्टेंबरपर्यंत पुढील चाचणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. आठवडाभरात पुन्हा उभे राहणे शक्य नाही. त्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न आमच्यासमोर आ वासून उभा आहे.
- हर्षल चौधरी
मी जिद्दीने या भरतीच्या रिंगणात उतरलो. २० फुटांवरून उडी मारण्याच्या फेरीसाठी जिद्दीने उंचावर उभा राहिलो. अशावेळी खाली उडी मारली तेव्हा मात्र ताडपत्री धरून उभ्या असलेल्यांचा तोल गेला. त्यामुळे खाली मी खाली कोसळलो. वेदनांनी विव्हळत असलेल्या माझ्याकडे कोणीच लक्ष दिले नाही.
- दीपक पिरन पाटील
अग्निशमन दलात नोकरी मिळावी म्हणून या भरतीत मी उतरलो. मात्र उंचावरील उडीदरम्यान पाय मुरगळल्याने जखमी झालो. पुढे काय करायचे, या विचाराने सध्या चिंतित आहे.
- विनायक कोळगे, सातारा
मी देखील या उमेदवारांच्या रांगेत होता. उंचावरील उडीदरम्यान खाली कोसळलो. त्यामुळे माझा पाय मुरगळला. त्यामुळे किमान दोन आठवडे तरी तो पायावर ताण पडेल अशी कामे करू शकत नाही. त्यामुळे आता घरची वाट धरली आहे.
- राहुल गणपत लगड, बीड
- जिल्हास्तरीय कबड्डीपटू असलेला नीलेश कंठे
या भरतीत उतरला होता. या वेळी उडी मारताना
त्याचे दोन्हीही पाय मुरगळले. किमान महिनाभर
तरी त्याला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागणार
आहे.