वृद्धाश्रमातील दिवाळी : निराधार वृद्ध शोधताय इतरांमध्ये आनंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2016 12:23 PM2016-10-28T12:23:49+5:302016-10-28T12:26:45+5:30

धुळे शहरातील मातोश्री वृद्धाश्रमात दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून दिवाळीचा फराळ आणि फटाके वृद्धांपर्यंत पोहचवले जातात.

Junagadh Diwali: Finding the old age of others happy! | वृद्धाश्रमातील दिवाळी : निराधार वृद्ध शोधताय इतरांमध्ये आनंद!

वृद्धाश्रमातील दिवाळी : निराधार वृद्ध शोधताय इतरांमध्ये आनंद!

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. २८ -  शहरातील साक्री रोडवरील नकाणे तलाव परिसरात असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रम आहे. दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून तेथे दिवाळीचा फराळ आणि फटाके वृद्धांपर्यंत पोहचवले जातात. त्याच्यातच आम्ही आनंद मानून आपली दिवाळी साजरी करतो, अशा प्रतिक्रिया वृद्धाश्रमातील वृद्धांनी व्यक्त केल्या़
साक्री रोडवरील मातोश्री वृद्धाश्रमात सध्या १७ पुरुष आणि १८ स्त्रिया असे एकूण ३५ वृद्ध वास्तव्यास आहेत.  ५ सप्टेंबर १९९८ रोजी या वृद्धाश्रमाची स्थापना करण्यात आली़ सुरुवातीला शासनाकडून अनुदान मिळत होते़ कालांतराने अनुदानात कपात झाली़.  आता डॉ़ के़ एम़ दुगल स्मृती समितीच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेवा प्रकल्प म्हणून मातोश्री वृद्धाश्रमाचा कारभार सुरू आहे़ शहरासह जिल्ह्यातून दानशूर येतात आणि त्यांच्या आर्थिक मदतीवर संस्थेचा कारभार चालतो.

दिवाळीचा आनंद द्विगुणित
दिवाळी जवळ आल्यानंतर अनेक दानशूर वृद्धाश्रमात येतात़ कोणी फराळ देतात तर कोणी फटाके. कोणी दैनंदिन गरजेच्या वस्तूही देतात. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि अधिकारीही येऊन वृद्धांसोबत दिवाळी सण साजरा करतात. असे चित्र एकीकडे असताना मात्र या आजी-आजोबांची स्वत:ची मुले,नातवंडे मात्र येथे येत नाहीत. हे दु:ख बाजूला सारत वृद्ध मंडळी आनंदाने इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधतात.


स्वतंत्र आरोग्य सुविधा
वृद्धाश्रमात स्वतंत्र आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉ़ एन. एन. निंबाळकर आठवड्यातून दोन वेळा येथे प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आवर्जून येतात.  याशिवाय याठिकाणी चक्की आहे, तसेच शुद्ध पाण्याचे यंत्रही .हे़ वृद्धांना सकस आहार मिळावा यासाठी सेंद्रिय भाजीपाला पिकविला जातो तसेट स्वतंत्र आचारीदेखील नेमण्यात आला आहे.
दिवाळीचा सण साजरा करत असताना शिस्तबद्ध नियोजनामुळे कोणाही आजी-आजोबांना घरची आठवण येऊ दिली जात नाही़. दिवाळीचे चार दिवस आनंदात घालविण्यासाठी वृद्धाश्रम प्रशासनाकडून प्रयत्न व नियोजन करण्यात येते. एरव्ही नव्हे, पण दिवाळीसारख्या वर्षातून एकदा येणाऱ्या सणाला तरी मुलांनी येऊन भेटावे, अशी अपेक्षा येथील वृद्धांची असते.


शेतीकाम करत मी माझे आयुष्य वेचले आहे़ आता वय वाढल्याने आणि पत्नीचे निधन झाल्याने इथे आलो़ ३ जुलै १९९९ पासून या वृद्धाश्रमात राहत आहे़ दिवाळी अशी काही साजरी करत नाही़ सर्व एकत्र येतो़ लक्ष्मीपूजन सामूहिकरित्या करतो आणि प्रेमाचा निरोपही देतो़
- वसंत आत्माराम कुलकर्णी

वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करत असताना सर्वाधिक मंडळी बाहेरुन येणारी असतात़ त्यांच्या भेटीगाठी होतात़ त्यांच्याकडून आम्हा वृद्धांना फराळ आणि फटाके वाटप होतात़ लोकांच्या मदतीत सहानुभूती आहे़ १२ वर्षांपासून मी याठिकाणी आहे़ बागकामाची मला खूप आवड आहे़
- डी़ एऩ इंगळे

वृद्धाश्रमातील दिवाळी आम्ही आमच्या घरासारखी समजतो़ दिनचर्येनुसार रोज तोच तो पणा असला तरी दिवाळीत येणारा मदतीचा ओघ आम्हाला घरची आठवण येऊ देत नाही़ तरुणपणी मला व्हॉलिबॉल खेळाची आवड होती़ वयोमानानुसार ही आवड आता राहिलेली नाही़ १९९८ पासून मी येथे आहे़
- शशिकांत भालचंद्र शुक्ल

आम्हा निराधारांना रोजच दिवाळी असल्याची अनुभूती येथे मिळते़ दानशूर व्यक्ती याठिकाणी येतात आणि आमच्या आनंदात ते स्वत:ही रममाण होतात़ गेल्या दहा वर्षांपासून मी याठिकाणी आहे़ उत्तमप्रकारे आमची व्यवस्था आहे़ दिवाळीत इतर मंडळींशी संवादामुळे आनंद मिळतो, घरच्यांची आठवण येत नाही़
- नवसाबाई पंडित

वृद्धाश्रमातच आयुष्य घालविण्याचे ठरविल्याने घरची आठवण अजिबात येत नाही़. प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन असल्यामुळे ही स्थिती आहे़ दिवाळीत सर्व एकत्र येतात़. दानशूरांकडून आलेला फराळ मिळतो़ त्याच्यात आम्ही समाधानी आहोत़. अभंगाची आवड आहे. नातवंडांच्या वाढदिवसाला येथूनच शुभेच्छा़
- सुशीला अर्जुन वाघ


केवळ आई आणि वडिलांसाठी मी माझे संपूर्ण आयुष्य वेचले, मुंबईत नोकरीला होते़ पण नंतर मला वृद्धाश्रमाची पायरी चढण्याचा प्रसंग ओढवला. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची पूजा मी सांगते. गावात नातेवाईक आहेत़ व्यवस्थापनाचे नियोजन असल्यामुळे सुविधा उत्तम आहेत. 
- सुषमा कुलकर्णी

Web Title: Junagadh Diwali: Finding the old age of others happy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.