कल्याण-कर्जत ४ तास ठप्प

By Admin | Published: June 27, 2015 02:22 AM2015-06-27T02:22:56+5:302015-06-27T02:22:56+5:30

मुसळधार पावसामुळे उल्हासनगर स्थानकादरम्यान डाऊन मार्गावरील रुळांखालची माती वाहून गेल्याने सुमारे १२ फूट खोल खड्डा पडला

Junk for 4 hours | कल्याण-कर्जत ४ तास ठप्प

कल्याण-कर्जत ४ तास ठप्प

googlenewsNext

डोंबिवली : मुसळधार पावसामुळे उल्हासनगर स्थानकादरम्यान डाऊन मार्गावरील रुळांखालची माती वाहून गेल्याने सुमारे १२ फूट खोल खड्डा पडला. वरून तीन-चार फूट दिसणारा हा खड्डा अजून खोल असल्याचे रेल्वे अभियंत्यांच्या वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातामुळे कल्याण-कर्जत मार्गावरील लोकल सेवा पहाटे ५.४५ च्या सुमारास ठप्प झाली. सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेने कल्याण-कर्जतची अप/डाऊनची वाहतूक बंद ठेवली होती. आठ दिवसात पाच वेळा मध्य रेल्वे विविध तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याने चाकरमान्यांसह प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
प्रशासनाकडून युद्ध पातळीवर त्या खड्यात भराव टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. घटनास्थळी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांसह अन्य विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. तांत्रिक विभागानेही गांभिर्याने तातडीने सर्व मदत यंत्रणा हालविली. प्रवाशांना ठिकठिकाणच्या स्थानकात उद्घोषणा यंत्राद्वारे घटनेबाबत सूचित करण्यात येत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वेला सहकार्य केल्याचे अंबरनाथ, बदलापूर, वांगणीसह कर्जतच्या प्रवाशांनी सांगितले. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या पुण्याकडे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय वाहतुकीचे तीनतेरा वाजले. सकाळीच ही घटना घडल्याने इंद्रायणीसह अन्य चार लांब पल्ल्याच्या गाड्यांना त्याचा फटका बसला. अखेरीस सकाळी ९.१५ च्या सुमारास पहिली गाडी या मार्गावरुन बदलापूरच्या दिशेने धावली आणि हळूहळू रेल्वेसेवा रूळावर आली.

Web Title: Junk for 4 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.