पालिकेची गर्भवतींसाठी कावीळ जनजागृती
By Admin | Published: August 4, 2016 05:18 AM2016-08-04T05:18:14+5:302016-08-04T05:18:14+5:30
पावसाळा सुरू झाल्यापासून दूषित पाणी आणि अन्नपदार्थांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून दूषित पाणी आणि अन्नपदार्थांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबईत गॅस्ट्रो, कावीळ असे आजार वाढत आहेत. गर्भवतींना काविळीची लागण झाल्यास त्यांच्या गर्भाला
धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी गर्भवतींनी कोणती काळजी घ्यावी, याविषयी माहिती
देण्यासाठी बोरीवलीतील आर-मध्य विभागात जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
पावसाळा सुरू झाल्यावर अनेक विभागांमध्ये गढुळ पाणी येते. अनेकदा काही ठिकाणी जलवाहिनी किरकोळ फुटलेली असते. त्याच्या जवळून सांडपाणी जात
असल्यास जलवाहिनीत सांडपाणी मिसळते. त्यामुळे गढूळ पाणी
येते किंवा पावसाळ््यात
जलवाहिनीत माती मिसळली जाते. याचबरोबर रस्त्यावरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्यामुळेही त्रास होऊ शकतो.
दूषित पाणी आणि अन्नपदार्थांमुळे हेपॅटायटिस ‘ए’ आणि ‘ई’ होण्याचा धोका असतो. या विषाणूंची लागण होणे सहज टाळता येऊ शकते, अशी माहिती या विभागात राहणाऱ्या नागरिकांना देण्यात आली.
या विभागातील गर्भवतींना माहितीपत्रके वाटण्यात आली. यामध्ये हेपॅटायटिसचे प्रकार, लक्षणे, कोणती काळजी घ्यावी, अशी सर्व प्रकारची माहिती देण्यात आली आहे. हेपॅटायटिस ‘बी’च्या विषाणूंची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हेपॅटायटिस टाळता येणे
शक्य असल्याचे या जनजागृती मोहिमेत नागरिकांना सांगण्यात
आले. (प्रतिनिधी)
>हेपॅटायटिसची लक्षणे
मळमळणे
भूक मंदावणे
अशक्तपणा
डोळे पिवळे दिसणे
कणकण येणे
हेपॅटायटिस टाळण्यासाठी
पाणी उकळून, गाळून प्या.
उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.
आजारी पडल्यास तत्काळ डॉक्टरकडे जाऊन या.