शाळांच्या परिसरात जंक फूडवर बंदी
By admin | Published: November 13, 2016 02:28 AM2016-11-13T02:28:05+5:302016-11-13T02:28:05+5:30
पौष्टिक भाजी-पोळीऐवजी मसालेदार, चटपटीत जंक फूडवर मुलांच्या उड्या पडत असतात. त्यात पिझ्झा आणि बर्गर म्हणजे त्यांचा वीक पॉर्इंट. मात्र यामुळे त्यांच्या आरोग्यावर
मुंबई : पौष्टिक भाजी-पोळीऐवजी मसालेदार, चटपटीत जंक फूडवर मुलांच्या उड्या पडत असतात. त्यात पिझ्झा आणि बर्गर म्हणजे त्यांचा वीक पॉर्इंट. मात्र यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने खासगी व पालिका शाळांच्या शंभर मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अशी ठरावाची सुचना महापालिकेच्या महासभेपुढे मांडण्यात आली आहे.
आई-वडील दोघंही नोकरदार असल्याने पाल्यांच्या खाण्यापिण्याकडे त्यांचेदुर्लक्षच होत असते. सकाळच्या वेळेत शाळा आणि कार्यालयासाठी तयारीच्या गडबडीत विद्यार्थ्यांना अनेकवेळा डब्ब्यात भाजी-पोळीऐवजी जंक फूड दिले जाते.
बरीच मुले मधल्या सुट्टीत दुकानात जाऊन असे पदार्थ खातात. मात्र सतत जंक फूडचे सेवन केल्याने सुस्ती येणे, मेंदूचा विकास न होणे, लहान वयातच लठ्ठपणा येणे, मधुमेह अशा आजाराचे प्रमाण वाढत आहे.
असे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या हानीकारक असल्याचे भारतीय खाद्य सुरक्षा व मानांकन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना डब्ब्यातून जंक फूड देऊ नयेत, असे पालकांना आवाहन करावे.
तसेच खाजगी व पालिका शाळेच्या आसपास शंभर मीटर परिसरात जंक फूड विक्रीला प्रतिबंध करण्याची मागणी काँग्रेसचे परमिंदर भामरा यांनी पालिका महासभेपुढे ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)
जंक फूड म्हणजे काय?
प्रक्रिया केलेले मसालेदार, चटपटीत खाद्यपदार्थ उदा. कॅण्डी, बेकरीचे पदार्थ, आईस्क्रीम, थंडपेय, पिझ्झा, बर्गर, फे्रंच फ्राईजसारख्या पदार्थांमध्ये पौष्टिक मूल्य नव्हे तर कॅलेरीज मात्र वाढतात. या खाद्यपदार्थांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कृत्रिम फ्लेव्हर वापरलेले असतात.
देशाच्या राजधानीत बंदी
दिल्ली सरकारने नुकतेच शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर बंदी आणण्याची तयारी केली आहे. शाळांमधील कॅन्टीनमध्ये जंक फूड ठेवू नये, अशी सुचनाही सरकारने केली आहे. काही खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डब्यातून पोळी-भाजी आणणे सक्तीचे केले आहे. आठवड्यातून एखाद्या दिवशी विद्यार्थ्यांना जंक फूड खाण्याची सूट दिली जाते.
जंक फूडचे आरोग्यावर दुष्परिणाम
याचा परिणाम मेंदूवर होत असल्याने स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती कमी होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
अति प्रमाणात पदार्थखाल्याने कालांतराने भुकेवर नियंत्रण राहत नाही. याचा परिणाम मेंदूच्या
विकासावर होत असल्याने काही काळाने काय खाल्ले, किती खाल्ले आणि किती भूक लागली आहे, यावर नियंत्रण राहत नाही.
रसायनिक बदल होऊन कालांतराने त्या व्यक्तीमधील उदासिनतेचे प्रमाण वाढते. साखरेचे प्रमाण अधिक व मेद वाढविणारे पदार्थ खाल्याने मेंदूच्या रसायनिक कार्यपद्धतीत बदल होतो. शरीरात मेदचे प्रमाण वाढल्यास उदासिनता वाढत असल्याचे समोर आले आहे.
अधिरपणा वाढतो, जंक फूड खाण्याची इच्छा रोखता येत नाही, भूक नसतानाही वारंवार खात राहण्याची
इच्छा होते.