शाळांच्या उपाहारगृहात जंकफूडला बंदी
By Admin | Published: May 8, 2017 08:06 PM2017-05-08T20:06:59+5:302017-05-08T20:06:59+5:30
साखर, मीठ आणि मेदाचा समावेश अधिक प्रमाणात असलेल्या जंकफूडला यापुढे राज्यातील शाळांमधील उपाहारगृहात बंदी असणार आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 8 - साखर, मीठ आणि मेदाचा समावेश अधिक प्रमाणात असलेल्या जंकफूडला यापुढे राज्यातील शाळांमधील उपाहारगृहात बंदी असणार आहे. जंकफूड खाल्ल्याने विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा, दातांचे विकार, मधुमेह, हृदयरोग असे आजार वाढीस लागण्यास मदत होत असल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आहारविषय अभ्यासासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने विद्यार्थ्यांच्या आहारातील पोषण मूल्ये सुधारून त्यांचा चांगल्या पद्धतीने शारीरिक आणि मानसिक विकास होण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. शाळेच्या उपाहारगृहात कोणते पदार्थ ठेवावेत व कोणते पदार्थ ठेवू नयेत, याबाबतही शिफारस करण्यात आली आहे. तसेच या उपाहारगृहांमध्ये साखर, मीठ आणि मेदाचे (जंकफूड) अधिक प्रमाण असलेले पदार्थ विकण्यास बंदी घालावी, असेही समितीचे सुचविले आहे. या शिफारशीनुसार राज्य शासनाने शाळांच्या उपाहारगृहांमध्ये जंकफूड ठेवण्यास व त्याची विक्री करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश सोमवारी काढण्यात आला असून त्यामध्ये पदार्थांची यादीही देण्यात आली आहे.
जंकफूडमध्ये जीवनसत्वे व खनिजांची असणारी कमतरता आणि मीठ, साखर व मेदाचे असणारे अतिप्रमाण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा आणि अन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे हे पदार्थ शाळांच्या उपाहारगृहात ठेवण्यात मनाई करण्यात आल्याचे शासन आदेश नमुद करण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापनावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये जंकफूड न खाण्याबाबत जनजागृती, समुपदेशन करण्याच्या सुचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत. शाळेचे भौगोलिक ठिकाण, ऋतू आणि परिसरातील खाण्याच्या सवयी विचारात घेऊन शाळांना या खाद्यपदार्थांशी साधर्म्य असणारे खाद्यपदार्थ निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.
---------------
उपाहारगृहांत हे पदार्थ ठेवावेत...
१. गहू किंवा एकापेक्षा जास्त धान्याची रोटी/पराठा. यामध्ये ऋतूनिहाय भाज्या वापरलेल्या असाव्यात
२. भात, भाजी पुलाव आणि डाळ
३. भाजी पुलाव
४. भात आणि काळा चना
५. गव्हाचा हलवा सोबत काळा चना
६. गोड दलिया सोबत नमकिन दलिया भाजी
७. भात आणि पांढरा चना
८. भात आणि राजमा
९. कढी भात
१०. गहू उपमा किंवा खिचडी, पपई/टोमॅटो/अंडी
११. चिंचेचा भात, हिरवे चणे
१२. भात, सांबर
१३. इडली, वडा, सांबर
१४. खीर, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दही, ताक, लस्सी
१५. भाज्यांचा उपमा
१६. भाज्यांचे सॅण्डवीच
१७. भाज्यांची खिचडी
१८. नारळाचे पाणी, शिकंजी, जलजीरा इ.
-------------------
उपाहारगृहात हे पदार्थ नसावेत
१. तळलेले पदार्थ जसे बटाट्याचे व इतर चिप्स
२. शीतपेय, सरबत, बर्फाचा गोळा
३. सर्व प्रकारची मिठाई
४. नुडल्स, पिझ्झा, बर्गर, टिक्का, पाणी-पुरी, गोल गप्पे
५. सर्व प्रकारच्या चघळण्याच्या गोळ््या आणि कँडी
६. जिलेबी, इमरती, बुंदी इ. (३० टक्के पेक्षा जास्त शर्करायुक्त असलेले पदार्थ)
७. सर्व प्रकारची चॉकलेट्स
८. केक आणि बिस्कीट
९. बन्स आणि पेस्ट्री
१०. जाम आणि जेली