नोकरीचे आमिष दाखवून लुटणारा गजाआड

By admin | Published: November 4, 2016 03:18 AM2016-11-04T03:18:18+5:302016-11-04T03:18:18+5:30

तरुणींची फसवणूक करणारा भिवंडीतील विश्वनाथ पाटील (२४) या भामट्यास गुन्हे शाखेच्या काशिमीरा युनिटने खडवली येथून अटक केली.

Junk hood | नोकरीचे आमिष दाखवून लुटणारा गजाआड

नोकरीचे आमिष दाखवून लुटणारा गजाआड

Next


मीरा रोड : फेसबुकवर बनावट खाते उघडून न्यायालय, बँक येथे नोकरी लावतो असे सांगून तरुणींची फसवणूक करणारा भिवंडीतील विश्वनाथ पाटील (२४) या भामट्यास गुन्हे शाखेच्या काशिमीरा युनिटने खडवली येथून अटक केली. आतापर्यंत १७ तरुणींना याने फसवल्याचे समोर आले आहे. गुरुवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विश्वनाथ याने माया पाटील या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडले होते. त्यावरुन त्याने अनेकांशी मैत्री केली. भार्इंदरच्या राई गावात राहणाऱ्या अशाच एका तरुणीशी त्याने फेसबुकवर मैत्री केली होती. तिच्याशी चॅटींग दरम्यान त्याने न्यायालयात नोकरभरती असल्याचे आमिष दाखवले. त्या तरुणीने राई गावातच राहणारी आपली मैत्रीण हेमांगी पाटील (१९) हीला नोकरीबाबत माहिती दिली. माया पाटीलच्या आडून त्याने हेमांगीचा भ्रमणध्वनी मिळवला. मग त्याने मायाच्या नावानेच हेमांगीला नोकरीला लावण्याचे काम करणारा साहेब म्हणून स्वत:ची ओळख करुन दिली.
सप्टेंबरच्या अखेरीस विश्वनाथने हेमांगीशी व्हॉट्स अ‍ॅपवर चॅटींग सुरु केले. ठाण्याला येऊन भेट मी माझा ड्रायव्हर पाठवतो असे तिला सांगून स्वत: विश्वनाथच ड्रायव्हर म्हणून आला. भार्इंदर एसटी डेपोजवळ २९ सप्टेंबरला तो हेमांगीला भेटला. गाडी खराब झाल्याचे सांगून दोघेही बसने ठाण्याला आले. ठाणे एसटी डेपोत उतरल्यावर ड्रायव्हर म्हणवणाऱ्या विश्वनाथने ‘साहेबांना आपण गरीब आहोत असे दाखवले तर नोकरी मिळेल,’ असे सांगत तिच्या कानातले सोन्याचे डूल, चमकी व मोबाईल असा सुमारे १४, ५०० रुपयांचा ऐवज काढून घेतला आणि पसार झाला.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने घरी सर्व प्रकार सांगितला. विश्वनाथने अशी अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता पाहता हेमांगी व तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ३ आॅक्टोबरला गुन्हा दाखल झाला. त्याचा तपास ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमीरा युनिटकडे सोपवला. पण फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅपवर त्याचा फोटो वा पत्ता मिळाला नाही. तो मोबाईलही फसवणूक केलेल्या तरुणीचाच वापरत असे. पण पथकाने शोध लावत खडवली येथून त्याला अटक केली.
हेमांगीला फसवल्यानंतर त्याने तिच्याच मोबाईलमधील एका मैत्रिणीशी संपर्क साधला. बँंकेत नोकरीचे आमिष दाखवले. आठवडाभराने तिला नायगाव रेल्वे स्थानकात बोलावले. तेथे देखील तो साहेबांचा ड्रायव्हर बनून आला आणि त्याच पध्दतीने हेमांगीच्या मैत्रीणीकडून तिचा मोबाईल, सोन्याच्या रिंगा व अंगठी असा सुमारे १५ हजाराचा ऐवज घेऊन पळून गेला. (प्रतिनिधी)
>गणेशपुरी ठाण्यातही गुन्हा दाखल
विश्वनाथने आतापर्यंत वसई, विरार, ठाणे, कल्याण येथील तब्बल १७ तरुणींना अशाप्रकारे फसवल्याचे कबूल केले. अशा तरुणींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. गणेशपुरी पोलीस ठाण्यातही विश्वनाथविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Junk hood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.